नवी दिल्ली – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हिंदूविषयक वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जोरदार पलटवार केला. हिंदूंवर खोटा आरोप लावण्याचे कारस्थान सुरू आहे.
हिंदू हिंसक असतात का? तसे म्हणणाऱ्यांना देश माफ करणार नाही. हिंदू समाजाला आपला अपमान योगायोग होता की कुठल्या बड्या प्रयोगाची तयारी याचा विचार करावा लागेल, असे मोदींनी म्हटले.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर लोकसभेत दोन दिवस चर्चा झाली. त्या चर्चेवेळी राहुल यांनी सोमवारी केलेल्या भाषणावरून मोठे राजकीय रणकंदन सुरू झाले आहे. संबंधित चर्चेला मंगळवारी मोदींनी लोकसभेत उत्तर दिले.
त्यावेळी त्यांनी प्रामुख्याने कॉंग्रेस आणि राहुल यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी राहुल यांचा उल्लेख बालक बुद्धी असणारी व्यक्ती म्हणून केला.
राहुल यांचा संदर्भ देऊन ते म्हणाले, स्वत:ची गैरकृत्ये उघड करण्याचे टाळून त्यांनी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. कोट्यवधी रूपयांच्या अपहाराबद्दल ते जामिनावर बाहेर आहेत. ओबीसींना चोर म्हटल्याबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात आले.
त्यांना बेजबाबदार वक्तव्यांबद्दल माफी मागावी लागली, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. कॉंग्रेस २०२४ वर्षापासून परोपजीवी पक्ष म्हणून ओळखला जाईल. कॉंग्रेस पक्ष मित्रपक्षांची मते खातो. मी आकड्यांच्या आधारे तसे बोलत आहे, असे त्यांनी म्हटले.