जम्मू – जम्मू काश्मीर पोलिसांनी द रेझिस्टंट फ्रंट या दहशतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्याला अटक केली. त्यामुळे या गटाकडून जम्मू शहरात केला जाणारा घातपाताचा कट उधळला गेला आहे.
द रेझिस्टंट फ्रंट ही अलिकडेच स्थापन झालेली संघटना असून तिचे लष्कर ए तोयबाशी संबंध असल्याचे सांगितले जात आहे. शेख सुनैन युसुफ उर्फ राजा असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. तो दक्षिण काश्मीर मधील गडपोरा गावचा रहिवासी आहे. त्याचे अन्य दोन साथीदार फरारी आहेत. त्यांचा शोध आता जारी आहे.
काश्मीरातील एक दहशतवादी गट जम्मूत येऊन काही घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर विविध सुरक्षा दलांनी एकत्र येऊन संशयितांच्या विरोधात मोहीम हाती घेतली. त्यात हा दहशतवादी सापडला.
जो दहशतवादी सापडला आहे त्याचा सूत्रधार अहमद खलिद उर्फ हमजा हा असून तो पाकिस्तान व्याप्त काश्मीरातील रहिवासी आहे.