पुणे – करोना बाधित रुग्णांची संख्या शुक्रवारी काही अंशी कमी झाली. गेल्या 24 तासांत 5 हजार 647 नवीन करोना बाधितांची नोंद करण्यात आली. याशिवाय 4 हजार 587 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
गेल्या 24 तासांत शहरात 51 बाधितांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी 7 रुग्ण हे शहराबाहेरील आहेत. ऍक्टिव्ह करोना रुग्णांची संख्या पन्नास हजारांच्या जवळ पोहोचली असून अत्यवस्थ रुग्णसंख्येनेही एक हजारांचा टप्पा ओलांडला आहे. शहरात सध्या 49 हजार 955 ऍक्टिव्ह बाधित रुग्ण आहेत. त्यापैकी 1 हजार 5 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
शहरातील आतापर्यंतची रुग्णसंख्या 3 लाख 18 हजार 29 झाली असून, त्यापैकी 2 लाख 62 हजार 420 बरे झाले आहेत. तर 5 हजार 654 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
दरम्यान, शहरात दिवसभरात 27 हजार 986 एवढ्या विक्रमी करोना टेस्ट झाल्या असून, सुरू असलेल्या निर्बंधांमुळे बाधित रुग्ण संख्येची टक्केवारी काहीशी घटल्याचे दिसून येत आहे.