पुणे – स्वत:चे घर शहरात असावे, असे प्रत्येकांचे स्वप्न असते परंतु वाढलेली महागाई, घरांच्या वाढलेल्या किंमती यामुळे घर घेण्याचे नागरिकांचे स्वप्न अपूर्ण राहते. सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरे मिळवून देण्यासाठी ‘म्हाडा’च्या माध्यमातून सध्या हे काम सुरु आहे.
दरम्यान, नुकतंच पुण्यात ‘म्हाडा’च्या घरासाठी अर्ज करण्यासाठी तारीख वाढविण्यात आली असून, सामान्य लोकांना दिलासा मिळाला आहे. यापूर्वी अर्ज करण्याची तारीख 13 मे पर्यंत होती. आता हीच तारीख वाढून 13 जून पर्यंत करण्यात आली आहे. ‘म्हाडा’च्या योजनांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना दर्जेदार आणि माफक किंमतीत घरे उपलब्ध होतात.
म्हाडाच्या सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सांगली या जिल्ह्यातील म्हाडाच्या 2153 सदनिका व 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील प्राप्त झालेल्या 755 सदनिका अशा एकूण 2908 सदनिकांची अंतिम नोंदणी 13 मे पर्यंत होती. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तसेच नागरिकांच्या व लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव या साठी अर्ज करण्याची तारीख वाढवली.