परीक्षार्थींना दिलासा ! आरोग्य विभागाची पुढील महिन्यात होणार परीक्षा

मुंबई  – आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांनी मनस्ताप व्यक्त केला होता. तसेच पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा होणार की नाही, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, हीच परीक्षा येत्या 15 -16 किंवा 22-23 ऑक्‍टोबरला होणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्यानंतर सर्व स्तरातून टीका केली जात होती. परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की आल्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. याबाबत आज पुन्हा एकदा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भूमिका स्पष्टपणे मांडली. तसेच, ही परीक्षा रद्द झाली नाही तर पुढे ढकलली आहे, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

राजेश टोपे म्हणाले, परीक्षा केवळ पुढे ढकलल्या आहेत आणि परीक्षा पुढे का ढकलल्या याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. मला असे वाटते की विद्यार्थी हीत हाच त्यामधला महत्वाचा विषय होता. शेवटी एक असते की, काही थोड्याफार विद्यार्थ्यांवर जर देखील कुठं अन्याय झाला किंवा त्यांना वंचित राहावे लागले. तरी देखील ते निश्‍चतपणे चुकीचे आणि अन्यायकारक आहे. म्हणूनच या मागची ही भूमिका लक्षात घेऊनच आपण ही गोष्ट केली आहे. न्यासा कंपनीची असमर्थता हेच त्यामागचे कारण होते. त्या दृष्टिकोनातूनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

तसेच, मी म्हणालो तसं परीक्षा रद्द झालेली नसून पुढे ढकलेली आहे. या संदर्भात सोमवारी आमच्या विभागाचे पदाधिकारी व न्यासाचे प्रमुख यांची बैठक होणार आहे. त्यानंतर पुढील तारखा ठरवल्या जाणार आहेत. पाच-दहा दिवस जास्त लागले तरी चालेल. परंतु, संपूर्ण ऑडिट, सर्व दक्षतांचा खात्री व तपासण्या करून घेऊनच यासंदर्भातील पुढील तारखांचा निर्णय घेतला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

साधारणपणे 15, 16 किंवा 22, 23 ऑक्‍टोबर तारीख असू शकते. 15 व 16 ऑक्‍टोबर रोजी होणारी रेल्वेची परीक्षा पुढे ढकलता आली, तर कदाचित आरोग्य विभागाची परीक्षा म्हणून आपल्याला 15, 16 ही तारीख घेता येईल. नाहीतर 22 व 23 ऑक्‍टोबर ही तारीख असू शकते.
याचे कारण असे आहे की पूर्वीच्या तारखा अनेक कारणांनी बुक असल्याने, तसेच शाळा देखील 4 ऑक्‍टोबरपासून सुरू होत आहेत. त्यामुळे शाळांची व शालेय व्यवस्थापनाची उपलब्धता हा आव्हानात्मक विषय असतो. त्यामुळे परीक्षांसाठी शनिवार व रविवार निवडला जात असतो, अशी देखील माहिती त्यांनी यावेळी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.