नगर (प्रतिनिधी) – लॉकडाऊनच्या काळात ज्या व्यक्तींना किरकोळ आजार आहेत. परंतु, ते आपल्या फॅमिली डॉक्टरकडेही जाऊ शकत नाहीत, अशा रुग्णांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘डॉक्टर आपल्या दारी’ उपक्रमाने दिलासा मिळाला. भारतीय जैन संघटना व फोर्स मोटर्स यांच्या योगदानातून नगरसेविका सुवर्णा दत्ता जाधव यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.
प्रभाग क्रमांक पंधरामधील विरंगुळा मैदान, आगरकर मळा, संजयनगर झोपडपट्टी, भीमवाडी, अचनाक वस्ती आदी परिसरात ही मोहीम राबविण्यात आली. नगरसेविका सुवर्णा जाधव, दत्ता जाधव, माजी नगरसेवक संजय चोपडा, प्रशांत गायकवाड, दीपक खैरे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष के. डी. खानदेशी, सुहास मुळे, विशाल गायकवाड, बजरंग भुतारे, सचिन बनकर, बंडू चावरे, सागर जेधे, रेखा विधाते, अभय कोठारी, डॉ. सागर पटवा आदींची ही मोहीम राबविण्यासाठक्ष परिश्रम घेतले.
लॉकडाऊनमुळे सर्वत्र बंद आहे. अनेक छोटे-मोठे क्लिनिक व दवाखानेही बंद आहेत. त्यामुळे किरकोळ आजारांवर सध्या घरगुती उपचार किंवा अंगावर दुखणे काढणे सुरु आहे. त्यासाठीच डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम प्रभागातील नागरिकांसाठी राबविण्यात आला. घराजवळच तज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध झाली. तपासणी करुन मोफत औषधे दिली जात असल्याने नागरिकांना सुविधा उपलब्ध झाल्याची माहिती माजी नगरसेवक दत्ता जाधव यांनी दिली.
दीपक खैरे म्हणाले,नागरिकांच्या आरोग्याची काळजीही महत्वाची आहे. त्यांच्या किरकोळ आजारांवर उपचार होऊन त्यांच्या शंकाचे निरसनही यातून होत आहे.” भारतीय जैन संघटना व फोर्स मोटर्सच्या सहकार्याने सर्वच नागरिकांसाठी ही सेवा उपलब्ध झाल्याने माजी नगरसेवक संजय चोपडा यांनी दोन्ही संस्थांचे आभार मानले.
ताप, खोकला, सर्दी, अंगदुखी, डोळ्यांचा दाह / सुज, नाक गळणे या आजारांची तपासणी करून मोफत औषधे दिली. मोबाईल व्हॅनच्या आसपास गर्दी होणार नाही, याचीही यावेळी दक्षता घेण्यात आली. मोबाईल व्हॅन समोर 4-4 फुटाच्या अंतरावर खुर्च्या ठेवलेल्या होत्या. या खुर्च्यांवर बसलेल्या रुग्णाची तपासणी क्रमाक्रमाने करण्यात आली.