‘यूजीसी’कडून मानव्यविज्ञान, सामाजिक शास्त्रच्या फेलोशिप रकमेत वाढ
पुणे – विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) मानव्यविज्ञान आणि सामाजिक शास्त्रे या विषयांतील विविध फेलोशिप अर्थात पाठ्यवृत्तीची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. “यूजीसी’च्या या निर्णयामुळे संशोधक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने कनिष्ठ संशोधन पाठ्यवृत्ती (जेआरएफ) आणि वरिष्ठ संशोधक पाठ्यवृत्ती (एसआरएफ) या संशोधन पाठ्यवृत्तीची रक्कम जानेवारीमध्ये वाढवली होती. त्यानंतर आता मानव्यविज्ञान आणि सामाजिक शास्त्रांसाठीच्या पाठ्यवृत्तीची रक्कम वाढवण्याचा निर्णय यूजीसीच्या 546व्या बैठकीमध्ये घेण्यात आला.
त्यानुसार डॉ. डी. एस. कोठारी पाठ्यवृत्तीमध्ये सर्वसाधारणसाठी पहिल्या वर्षात तीन हजार, द्वितीय वर्षात चार हजार, तृतीय वर्षात साडेसात हजार, उच्च गटात साडेसात हजार रुपये वाढवण्यात आले आहेत. डॉ. एस. आर. बालकृष्णन पाठ्यवृत्तीमध्ये पहिल्या वर्षासाठी आठ हजार दोनशे, द्वितीय वर्षासाठी आठ हजार सातशे, तृतीय वर्षासाठी बारा हजार शंभर रुपयांनी वाढ करण्यात आली.
तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांसाठीच्या पीडीएफ पाठ्यवृत्तीमध्ये अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय वर्षासाठी अनुक्रमे आठ हजार दोनशे, नऊ हजार दोनशे आणि तृतीय वर्षासाठी सात हजार पाचशे रुपये वाढवले आहेत. महिलांसाठीच्या पीडीएफ पाठ्यवृत्तीसाठी आठ हजार दोनशे, दहा हजार दोनशे, सात हजार पाचशे रुपयांनी वाढ केल्याचे “यूजीसी’ने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.