पुणे विभागाला दिलासा; बाधितांचा वाढता आलेख घसरला

"करोना रावणा'वर बाधित रुग्णांचा विजय

पुणे – दसरा-दिवाळी सणोत्सवानंतर करोनाबाधितांची दुसरी लाट येणार, असा अंदाज केंद्रीय पथकाने वर्तविला असला तरी पुणे विभागात दसऱ्याच्या मुहूर्तावर “करोना रावणावर’ बाधित रुग्ण विजय मिळवत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.


मागील महिन्यापर्यंत करोना बाधितांचा वाढता आलेख खाली येतोय. तर करोनामुक्तीचा आलेख वाढत असून आज पुणे विभागातील करोना मुक्तीच्या संख्येने साडेचार लाखांचा टप्पा पार केला आहे.

विभागात बाधित संख्या 4 लाख 93 हजार 498 असून, त्यातील 4 लाख 52 हजार 74 बाधित बरे झाले आहेत. मागील सात दिवसांत करोनामुक्तीच्या प्रमाणात दोन टक्कयांनी वाढ झाली असून, 91.61 टक्‍के एवढे प्रमाण आहे.

ऑक्‍टोबर महिन्याच्या सुरवातीपासून बाधित संख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यातच बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या महिन्यात “बाधित कमी आणि करोनामुक्त अधिक’ असे चित्र आहे. विशेषत: पुणे शहरात बाधित सापडण्याचा वेग खाली आला आहे.

सप्टेंबर महिन्यात विभागामध्ये करोनामुक्‍तीचे प्रमाण 77 ते 78 टक्‍के इतके होते. तर आज हे प्रमाण जवळपास 92 टक्‍क्‍यांपर्यंत आले आहे. सक्रिय बाधितांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. आठ दिवसांपूर्वी ही संख्या 36 हजार 773 इतकी होती. आज त्यामध्ये जवळपास नऊ हजाराने घट झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.