जैन धर्मियांना दिलासा; “आयंबील ओळी’साठी मंदिरातील स्वयंपाक घर वापरण्यास परवानगी

मुंबई – जैन धर्मियांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. येत्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या “आयंबील ओळी’ या नऊ दिवसांच्या उत्सवांतर्गत जैन मंदिराच्या भोजनालयातील स्वयंपाक घर हे प्रसाद बनविण्यासाठी खुली करण्यास न्यायालयाने सशर्त परवानगी दिली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यभरातील 58 जैन मंदिर व्यवस्थापनांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यासंदर्भातील याचिकेवर न्यायमूर्ती एस. सी.गुप्ते आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू केले असून त्यानुसार सर्व धर्मांची प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, हॉटेल आणि रेस्टॉरंट्‌सप्रमाणे मर्यादित स्वयंसेवकांच्या उपस्थितीत मंदिरातून प्रसादाची होम डिलिव्हरी देता येऊ शकते, अशी भूमिका राज्य सरकारच्या वतीने ऍड. ज्योती चव्हाण यांनी न्यायालयापुढे मांडली.

त्यांची बाजू एकून घेत प्रत्येक जैन मंदिर व्यवस्थापनाला जास्तीत जास्त सात स्वयंसेवकांच्या उपस्थितीत अथवा होम डिलिव्हरीमार्फत भोजनालयातील प्रसाद पार्सल रुपाने भाविकांच्या घरी पोहचवण्यास न्यायालयाने परवानगी दिली. त्यावेळी मंदिरातील स्वयंपाक घरात अथवा मंदिरात भाविकांना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश करण्यास खंडपीठाने मनाई केली आहे.

तसेच जैन मंदिर व्यवस्थापकांकडून ज्या सात स्वयंसेवकांची निवड करण्यात येईल त्यांची वैयक्तिक माहिती म्हणजे नाव आणि इतर तपशील मंदिर व्यवस्थापन समिती आणि स्थानिक पोलीस स्टेशन तसेच पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाकडे जमा करणंही अनिवार्य असेल, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.