नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला भारतीय ऍथलेटिक्स संघासह चालण्याच्या शर्यतीतील स्पर्धक के. टी. इरफानला मोठा दिलासा मिळाला आहे. के. टी. इरफानची दुसरी करोना चाचणी केली असता त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. इरफानसह अन्य पाच ऍथलेटिक्स खेळाडूंचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला इरफान काही दिवसांपासून बंगळुरू येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणात (साई) सराव करत आहे. त्याची काही दिवसांपूर्वी करोना चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्याला आयसोलेट करण्यात आले होते. इरफानसह अन्य खेळाडूंनाही करोनाचा संसर्ग झाला होता. यात चार पुरुष, एक महिला क्रीडापटूसह चार मार्गदर्शकांचा समावेश होता. या सर्वांनी 29 एप्रिल रोजी लसीचा पहिला डोस घेतला होता.
साईच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाच खेळाडूंची गुरुवारी दुसरी करोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा आज अहवाल मिळाला असून सर्वजण निगेटिव्ह आहेत. यानंतर इरफानने पुन्हा सराव करण्यास सुरूवात केली आहे.
दरम्यान, 31 वर्षीय इरफानने 2019मध्येच ऑलिम्पिकमधील आपले स्थान निश्चित केले आहे. तो 20 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.