समाविष्ट गावात महापालिका कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याच्या विचारात

कचरा संकलन व विल्हेवाटाची माहिती घेण्यास सुरुवात

वाघोली : पुणे महापालिकेत वाघोलीसह २३ गावांचा समावेश करण्यात आल्यानंतर येथे दैनंदिन जमा होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण आणि विल्हेवाटाची व्यवस्था याचे सर्व्हेक्षण करण्यात येत असून याठिकाणी कचराप्रक्रिया प्रकल्प करण्याच्या विचारात महापालिका आहे.

वाघोलीमध्ये कचरा समस्या गंभीर आहे. कचरा संकलन आणि त्याचे व्यवस्थापन यावर नियोजनात्मक काम झालेले नाही. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात झालेल्या बांधकामामुळे व वाढत्या नागरी वस्त्यांमुळे कचरा मोकळ्या जागेत, रस्त्याच्या कडेला टाकला जातो.

स्वच्छच्या माध्यमातून घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे तसेच अस्ताव्यस्त टाकलेला सदरचा कचरा उचलून विल्हेवाट लावण्याच्या वाहतुकीवर लाखो रुपयांचा खर्च वाघोली ग्रामपंचायतीकडून करण्यात येत होता. कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा मागणीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केले आहेत.

समाविष्ट गावांपैकी वाघोली, नऱ्हे, कोंढवे-धावडे, मांजरी खुर्द या गावांमध्ये सर्वाधिक कचरा निर्माण होत आहे.

महापालिकेच्या घनकचरा विभागाने २३ गावांमधील कचऱ्याचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून सध्याची कचरा विल्हेवाटीची व्यवस्था, ओल्या व सुक्या कचऱ्याचे प्रमाण, कचरा वाहतूक व्यवस्था, उपलब्ध वाहने, मनुष्यबळ तसेच कचरा प्रकल्पांसाठी गायरान जमिनी उपलब्ध आहे का? अशा माहितीचे संकलन केले जात आहे.

वाघोली मधील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार,  वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे  यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करण्यात येत आहे.
राजेंद्र सातव पाटील, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत वाघोली

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.