अग्रलेख : विचारवंतांची खंत लक्षात घ्या

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता देशातील देशभक्‍तीचा आणि युद्धखोरपणाचा ज्वर कमी झाला असेल तर देशातील इतरही घटनांची दखल घ्यावी लागेल.दहशतवादाच्या पाठीशी असलेल्या पाकिस्तानला धडा शिकवला जाईल तेव्हा जाईल, पण सध्या देशातील विचारवंत आणि कलाकारांमध्ये जी अस्वस्थता आहे, त्याची योग्यवेळी दखल घेतली जाणार आहे की नाही हा खरा प्रश्‍न आहे.

पाकिस्तानशी युध्द करून आणि त्यांना धडा शिकवून देशाच्या सीमा सुरक्षित करता येतील. पण देशच्या नागरिकांमध्ये वाढू लागलेली असुरक्षितेची भावना कमी करण्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे हे सत्ताधारी पक्षांसह सर्वच पक्षांनी समजून घेण्याची गरज आहे. गेल्या दोन दिवसांच्या कालावधीत विचारवंत आणि कलाकारांनी व्यक्‍त केलेली खंत पहाता सरकारला याकडे लक्ष द्यावेच लागणार आहे.

नागपूर यथील 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी आणि उद्‌घाटक महेश एलकुंचवार यांनी देशातील सद्य परिस्थितीबाबत व्यक्त केलेली मते विशेष लक्षणीय आहेत. तसेच योगायोगाने ज्येष्ठ हिंदी साहित्यिक उदय प्रकाश यांनीही मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना अशीच खंत बोलून दाखवली आहे. “हल्ली कुणीही उठतो आणि लेखक-कलावंतांना वेठीस धरतो. त्यांच्या तोंडाला काळे फासले जाते. मारण्याची धमकी दिली जाते. ठारही केले जाते. पण या गुन्ह्याबद्दल शिक्षा मात्र कुणालाच होत नाही. उलट हे गुंड मोकाट फिरत असतात.

त्यांच्या भीतीने लेखक-कलावंतांनी सृजनाविष्कार करायचे सोडून, आता स्वत:च्या संरक्षणासाठी “विचार स्वातंत्र्य सेना’ काढावी काय’, असा जळजळीत सवाल प्रेमानंद गज्वी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केला आहे. तर “आपले राज्यकर्ते कधीच सहिष्णू नव्हते,’ असे सडेतोड प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी केले. ‘हल्ली संवाद होऊच नये असं वाटणाऱ्यांचे दिवस आहेत.

बंधुभाव, शांतता एवढंच काय, झाडं, नदी आणि हवेविषयी बोललं तरी हल्ली स्वत:लाच अपराधी वाटायला लागते,’ अशी खंत उदय प्रकाश यांनी बोलून दाखवली आहे. या तीनही लेखकांनी व्यक्‍त केलेले विचार समाजातील लोकांसाठी मननीय आणि राजकारण्यांसाठी चिंतनीय मानावे लागतील. एलकुंचवार यांनी तर स्पष्ट शब्दात “आपण कधीच सहिष्णू नव्हतो’ असे सांगून सर्वच राजकीय पक्षांना एकाच पंगतीत आणून बसवले आहे. त्यासाठी त्यांनी उदाहरणेही दिली आहेत.

व्यवस्थेविरोधात बोलणाऱ्या नाटककार सफदर हाश्‍मींचा राजधानी दिल्लीतच खून करण्यात आला. “सॅटेनिक व्हर्सेस’ या कादंबरीवर फक्त भारतातच बंदी घातली गेली. “घाशीराम कोतवाल’, “सखाराम बाईंडर’ या मराठी नाटकांवर बंदी आणण्यात आली. या सर्व घटना विविध राज्यकर्त्यांच्या काळात घडल्या असल्याने कोणताही सत्ताधारी कधीच सहनशील आणि सहिष्णू नसतो हीच बाब समोर येते. मोदी सरकारच्या राजवटीत असहिष्णुता हा शब्द जरा जास्तच वापरला गेला असला तरी याआधीही खूपच कमी राज्यकर्त्यांनी आपली सहनशीलता दाखवून दिली आहे.

दुसरीकडे, सामाजिक सहनशीलतेवा विचार करायचा झाला तर ती गेल्या काही काळात संपूर्णपणे दिसेनाशी झाली आहे ही बाबही लक्षात घ्यावी लागते. राजकीय पक्षांच्या विचारांवरच आणि आदेशांवरच पोसल्या गेलेल्या समाजघटकांची सहनशीलता सध्या जात आणि धर्म या राक्षसांनी गिळून टाकली आहे. नागपूरमध्ये याबाबत एलकुंचवार यांनी बोलून दाखवलेली खंत म्हणूनच महत्वाची आहे. “मराठीत नाटक करणाऱ्याला नाटयकर्मी किंवा रंगकर्मी म्हटले जाते.

डॉ. श्रीराम लागू किंवा तात्यासाहेब शिरवाडकर यांनी त्यांना रंगधर्मी हा नवा शब्द दिला. परंतु हल्ली “धर्म’ या शब्दाने दचकायला होते. हल्ली धर्माची जी व्याख्या करण्यात येत आहे ती वेगळीच आहे. ज्यांना ती मान्य नाही, त्यांना धर्मविरोधी ठरवले जात आहे’, असे एलकुंचवार यांनी म्हटले आहे. “दुसऱ्याला दु:ख न देणे हा धर्माचा खरा अर्थ आहे, अशी शिकवण सर्वच धर्म देत असले तरी कुणालाच हा धर्म कळलेला नाही. आज आम्ही सांगू तो धर्म आणि तो मानला नाही तर त्यांना धर्मद्रोही, राष्ट्रद्रोही ठरवले जाते,’ या शब्दात त्यांनी आपली खदखद बोलून दाखवली आहे.

स्वत:च्या विचारसरणीला न पटणाऱ्या प्रत्येक गोष्टीला हिंसक विरोध केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवरच गज्वी यांनी “लेखक-कलावंतांनी विचारस्वातंत्र्य सेना काढावी काय’, असा जो जळजळीत सवाल केला आहे; त्याचे उत्तर देण्याची जबाबदारी सर्वांनीच घ्यायला हवी. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे रक्षण करण्याची जबाबदारी जेवढी सीमेवरील जवानांची आहे तेवढीच किंवा त्यापेक्षा जास्त जबाबदारी विविध समाजघटकांची आहे हे विसरुन चालणार नाही.

लेखकांनाही आता प्रत्युत्तरादाखल एखादी सेना काढावी वाटत असेल, तर ते आपल्या लोकशाहीचे अपयशच मानावे लागते. अर्थात या विचारवंतांनी फक्त समस्या मांडणी केली नाही, तर तोडगाही सुचवला आहे. जिथे विचारांची निर्मिती मरते तो समाज मरतो नि ते राष्ट्रही मरते. विरोधी विचार म्हणजे समाजाच्या सुखासाठीचे मार्गदर्शन असते.

हे मार्गदर्शन सतत होत राहिले पाहिजे, तरच समाजाच्या सुखासाठी योग्य ते काम करता येईल, अशी सकारात्मक भावना त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचीही दखल घेउन आता राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि सर्वच धर्मांचे नेते यांनी चर्चा आणि विरोधी विचार यांचा उचित आदर राखला तरी खूप काही साध्य झाले, असे म्हणता येईल.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×