महापालिका आयुक्त : राज्य सरकारकडून मार्गदर्शन घेणार
पुणे – राज्यातील लॉकडाऊन 31 जुलैला संपत असताना सरकारच्या यापूर्वीच्या आदेशानुसार पुण्यातील उद्याने आणि हॉटेल्स सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. तूर्तास शहरात करोना बाधितांच्या संख्येचा विचार करता “रेड झोन’मध्ये असलेल्या पुण्याबाबत राज्य सरकारकडून मार्गदर्शन घेतल्यानंतरच उद्याने आणि हॉटेल्स सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शुक्रवारी दिली.
लॉकडाउनची मुदत गुरूवारी संपल्यानंतर शुक्रवारपासून सगळे व्यवहार अटींसह सुरू झाले. राज्य सरकारने हॉटेल्सना सुरक्षेच्या अटींसह सुरू करण्याला या आधीच परवानगी दिली आहे. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने रोजची बाधितांची वाढणारी आकडेवारी पाहता त्याची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेतला आहे. ते सुरू करण्याबाबत राज्य सरकारच्या मार्गदर्शनानुसारच पुढील कार्यवाही करू, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
कंटेन्मेंट क्षेत्रांची संख्या आता 87
शहरातील कंटेन्मेंट क्षेत्रांची गुरूवारी नवीन रचना जाहीर करण्यात आली आहे. कंटेन्मेंट क्षेत्रांची संख्या 109 वरून 87 पर्यंत कमी झाली असली, तरी क्षेत्रफळ वाढले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत मोठ्याप्रमाणावर टेस्ट केल्याने शहराच्या सर्वच भागातील रुग्णांची संख्या वाढली आहे. आजमितीला सुमारे साडेपाच हजार रुग्ण होम क्वारंटाइन आहेत; तर तितकेच कोविड सेंटरमध्ये आहेत. तर उर्वरित पाच ते साडेपाच हजार रुग्ण उपचार घेत आहेत.
शहरातील करोनाचा मृत्यूदर हा अडीच टक्के असून, तो मुंबई आणि राज्यापेक्षा कमी आहे. पुढील महिन्यात रुग्णसंख्या वाढेल, असा अंदाज आहे. याचा विचार करून ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सुविधा असलेले सुमारे 800 बेडचे जंबो कोविड सेंटर उभारण्याची तयारी सुरू आहेत. तोपर्यंत सध्या च्या हॉस्पिटल्समधील ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही दिवसांत हे 300 बेड्स वाढतील.
– विक्रम कुमार, आयुक्त, मनपा.