नवी दिल्ली – भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजे एलआयसीची नोंदणी परदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी परदेशातच करण्याच्या शक्यतेवर केंद्र सरकार गंभीरपणे विचार करीत असल्याचे वृत्त आहे.
या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत या कंपनीचा आयपीओ काढण्याच्या शक्यतेवर सरकार विचार करीत आहे. त्याची तयारीही चालू आहे.
दरम्यान भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन या कंपनीची निर्गुंतवणूक पुन्हा लांबणीवर पडली आहे. यासाठी निविदा भरण्याची तारीख चौथ्या वेळी पुढे ढकलण्यात आली आहे. आता 16 नोव्हेंबरपर्यंत निविदा दाखल करता येतील. मूळ तारीख 2 मे होती. त्यामध्ये वेळोवेळी वाढ करण्यात आली.
लॉकडाऊनचा परिणाम झाला असल्यामुळे निविदा सादर करण्याची तारीख वाढविण्याची गरज बऱ्याच इच्छुकांनी व्यक्त केली होती. सर्व परिस्थितीचा विचार करून तारीख वाढविण्यात आली आहे. यावर्षी सरकारने निर्गुंतवणुकीतून 2.1 लाख कोटी जमा करण्याचे ठरविले आहे. मात्र याला आतापर्यंत फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.