वनसंपत्तीच्या संवर्धनासाठी उदासीनता

– शिवाजी गाडे

डिंभे – आंबेगाव तालुक्‍याचा पश्‍चिम पट्टा हा वन परिक्षेत्रातील अभय अरण्यात मोडत असून एकूण 130 चौरस किमी क्षेत्र वन परिक्षेत्रात मोडत आहे. चिखली परिसरात मागील वर्षी तळेघर या ठिकाणी वन विभागाच्या वतीने जंगल प्रवण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली होती. मात्र, सद्य तेथे झाडे नसून केवळ खड्डे उरले आहेत. जंगल रक्षण व संवर्धनासाठी गाव पातळीवर नेमण्यात आलेल्या वन संरक्षण समिती कागदावरच राहिली की काय? असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.

जंगलांचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी गावपातळीवर वन संरक्षण समिती स्थापन करण्यात आली आहे. सरकारने जंगल संवर्धनासाठी करोडो रुपयांचा निधी खर्च केला आहे. समितीच्या माध्यमातून जंगलाचे संवर्धन होण्याऐवजी जंगलाचे अस्तितत्व नष्ट होताना दिसत आहे. जंगलातील वणवे विझवणे, वृक्ष लागवड व संवर्धन करणे तसेच जंगलातील बेकायदेशीर घडामोडीवर नियंत्रण ठेवणे आदी कामे समितीच्या माध्यमातून होणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक वेळा असे होताना दिसत नाही. यामुळेच वणव्यामध्ये वाढ झाली आहे.

वनविभागाचे मानचिन्ह असणारे शेकरू प्रामुख्याने भीमाशंकर, तळेघर या भागात दिसत होते. मात्र, मागील वर्षी जी वृक्ष लागवड करण्यात आली होती त्या ठिकाणी झाडे नसून प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे साम्राज्य असल्याने शेकरू प्रामुख्याने नष्ट होताना दिसत आहे. जंगलात लागणाऱ्या वणव्यामुळे पशु, पक्षी तसेच वृक्षांची हानी मोठ्या प्रमाणात होत असून यामध्ये अनेक पशु-पक्षी मृत्युमुखी पडतात. जंगलाना लागणारे वणवे विझविण्यासाठी वन विभागाकडे कोणतीही व्यवस्था नाही. यामुळे वणवे विझविण्यासाठी मनुष्यबळाची मोठी गरज भासते. अशा वेळी या समित्यांनी सहकार्य करणे गरजेचे असते. मात्र, गावपातळीवरील राजकारणामुळे समितीमध्येही गट-तट निर्माण झाल्याने या समित्या कुचकामी ठरत आहेत.

जंगलाचे अस्तित्व धोक्‍यात
वन विभागाने या समित्यांना प्रोत्साहन पर लाखो रुपयांची बक्षिसे दिली. मात्र, जंगल प्रवणक्षेत्रात होणाऱ्या गैरप्रकाराना आळा घालण्यात वन विभाग व वन संरक्षण समित्या अपयशी ठरल्या आहेत. वन विभागच्या भोंगळ कारभारामुळे वन परिक्षेत्रात लागणाऱ्या वणव्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होत असून जंगलाचे अस्तित्व नष्ट होत चालले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.