संरक्षण : संगणकीय धोक्याखालील अण्वस्त्रे (भाग १)

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

अमेरिकेतील न्यूक्‍लियर थ्रेट इनिशिएटिव्ह, सायबर न्यूक्‍लियर वेपन्स स्टडी ग्रुपने मे 2019मध्ये रशियामध्ये सादर केलेल्या “न्यूक्‍लियर वेपन्स इन न्यू सायबर इरा’ या नव्या अहवालानुसार केवळ संगणकीय धरबंद तंत्रज्ञानाचा (सायबर डेटरण्ट सिस्टिम्स) वापर करून आण्विक अस्त्रांना संगणकीय हल्ल्यापासून (सायबर थ्रेट टू न्यूक्‍लियर वेपन्स) वाचवता येणे अशक्‍य नसले तरी अत्यंत कठीण आहे.

आण्विक शस्त्रांसहित, सांख्यिक अंक प्रणाली (डिजिटल सिस्टीम) वापरणारी कुठलीही कार्यप्रणाली संगणकीय आण्विक धोक्‍याखाली असतेच असते. सांख्यिक तंत्रज्ञानाच्या विकास आणि विस्तारामुळे माहितीच्या अंतरिक्षावरील हल्ले जास्त धोकादायक व तीव्र होत जातील. अमेरिकेसारख्या जागतिक महाशक्तींनाही या धोक्‍याचा फटका बसण्याच्या शक्‍यता आहेत. अशा संगणकीय आण्विक हल्ल्यांमुळे कोणत्याही मिलिटरी कमांडला त्याच्यावरील आण्विक हल्ल्याची खोटी पूर्वसूचना मिळण्याच्या आणि त्यानुसार आपल्या आण्विक व पारंपरिक सैन्यदलांवरील विश्वास उडण्याच्या शक्‍यता आहेत. अशा संगणकीय हल्ल्यांमुळे, पावर ग्रीडवरील ताबा कमी अथवा अस्तव्यस्त होऊन आण्विक शस्त्रांच्या साठ्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्‍यतादेखील नाकारता येत नाही.

कुठल्याही राष्ट्राच्या आण्विक धरबंध प्रणालीवर (न्यूक्‍लियर डेटरन्स सिस्टीम) संगणकीय हल्ला झाल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचा विचार केल्यास खालील बाबी प्रकर्षाने समोर येतात.

अ) ज्या राष्ट्रावर असा संगणकीय हल्ला होऊन आण्विक हल्ल्याचा आभास निर्माण केला जाईल त्या राष्ट्रांच्या आण्विक पूर्वसूचना प्रणालीवर (न्यूक्‍लियर अर्ली वॉर्निंग सिस्टीम) घातक परिणाम झाल्यामुळे, आपल्यावर खरेच आण्विक हल्ला झाला आहे अशी शंका निर्माण होऊन ते राष्ट्र बदल्यासाठी खरोखरीचा आण्विक प्रती हल्ला करू शकते.

ब) संरक्षणतज्ज्ञांच्या मते, कोणत्याही राष्ट्रावर अशा प्रकारचा सायबर अटॅक झाल्यास त्या राष्ट्राची सुरक्षा व्यवस्था कोलमडून जाईल आणि त्यामुळे ते राष्ट्र अविचारी-आकस्मिक आण्विक हल्ला करण्याची शक्‍यता अधिक असेल. कोणत्याही राष्ट्राच्या कंट्रोल सिस्टीमवर असा संगणकीय हल्ला करून तेथे खोटा “न्यूक्‍लियर रिलीझ ऑर्डर’ निर्माण करून, त्या राष्ट्राच्या मिलिटरीला आण्विक अस्तराचा वापर करण्यास बाध्य/उद्युक्त करण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही.

क) कोणत्याही राष्ट्राच्या “कमांड ट्रान्समिशन अँड इंटरनॅशनल कम्युनिकेशन चॅनेल्स’ना उद्‌ध्वस्त करण्याची शक्ती, संगणकीय हल्ल्यामध्ये असते. अशा प्रकारचा संगणकीय हल्ला, कमांड अँड कम्युनिकेशन सिस्टीम तयार झाल्यावर किंवा ती तयार होत असतांना त्याच्या संगणकीय आज्ञावलीमधे मालवेअरचा प्रादुर्भाव/अंतर्भाव करून करता येतो. संगणकीय हल्ल्यापासून आण्विक शस्त्रांचा बचाव करण्यासाठी केवळ अत्याधुनिक तंत्र कौशल्याचीच नाही, तर त्याच्या जोडीला, आण्विक अस्त्राची निर्मिती झाली तेंव्हा अस्तित्वात नसलेल्या पण आजमितीला प्रत्यक्षात आलेल्या, संगणकीय धोक्‍यांविरुद्ध बचाव पद्धत निर्माण करण्याची नितांत गरज असते.

संरक्षणतज्ज्ञांच्या मते, संगणकीय हल्ला झाल्यानंतरच्या चार कथानकीय रूपरेखांमधे (सिनेरियोज) रडार्स आणि टेहाळणी उपग्रहांसारख्या अर्ली वॉर्निंग सिस्टीम्सवरील हल्ला, आण्विक सुरक्षा व्यवस्थेवरील हल्ला, अंतरिक्षिय व अंतर्देशीय दळणवळणावरील हल्ला आणि आण्विक उत्पादन प्रणालीवरील हल्ला सामील असतो.आण्विक हल्ल्याची खोटी बातमी आणि/दळणवळणीय उद्‌ध्वस्तता यांच्यामुळे पीडित राष्ट्राद्वारे बदल्याच्या आण्विक उत्तराची शक्‍यता नाकारता येत नाही.
आण्विक सुरक्षा व वैध रक्षणावरील संगणकीय हल्ल्यामुळे आण्विक अफरातफरीची संभावना वृद्धिंगत होते. पूर्ण झालेल्या प्रणालीमध्ये मालवेअर टाकण्यात यश आले तर आण्विक धरबंदांवरील विश्वासाला तडा जाण्याची शक्‍यता असते. “आपण आण्विक हल्ला थांबवण्यात असफल होऊ शकणार नाही’ असा अविश्वास एकदा का मिलिटरीच्या मनात निर्माण झाला की सामरिक संतुलनावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

संरक्षण : संगणकीय धोक्याखालील अण्वस्त्रे (भाग २)

Leave A Reply

Your email address will not be published.