मुंबई : राज्यात काही दिवसांपूर्वी केंद्रय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद चांगलाच विकोपाला गेला होता. या प्रकरणात राणेंना अटकही झाली होती. दरम्यान याच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची मोठी बातमी समोर येत आहे.
संजय राऊत यांच्या घर आणि सामनाच्या कार्यालयाला छावणीचे स्वरूप आले आहे. त्याचसोबत, डीसीपी प्रशांत कदम संजय राऊत यांच्या भेटीला गेल्याची देखील माहिती समोर येत आहे.
एका वृत्तवाहिनीने याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, भाजप नेते नितेश राणे यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आणि राणे-सेना वादानंतर हे पाऊल उचलण्यात आल्याचे म्हटले जात आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार, संजय राऊत यांच्याकडे सध्या वाय दर्जाची सुरक्षा आहे. राऊत यांच्या या ताफ्यात सध्या ६ शस्त्रधारी SPU जवानांचा ताफा आहे. मात्र, आता त्यांच्या ताफ्यात २ अतिरिक्त SPU चे जवान देखील समाविष्ट करण्यात आले आहेत.
काहीच दिवसांपूर्वी भाजपा नेते नितेश राणे आणि निलेश राणे यांनी संजय राऊत यांना एक इशारा दिला होता. संजय राऊत जिथे दिसतील तिथे करेक्ट कार्यक्रम करू, असा या दोघांनीही सांगितले होते. त्यानंतरच आता राऊत यांच्या सुरक्षेत ही वाढ करण्यात आल्याचे दिसून येत आहे.