पुणे – गरीब कुटुंबातून पुढे आलेले माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे हे कधी आपली जन्मभूमी, वस्ती आणि झोपडपट्टी भागाला विसरले नाहीत. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना बागवे यांनी झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करून त्यांना हक्काचे घर मिळवून दिले. झोपडीतून हक्काच्या घरात नेले. गरिबांना हक्काचा निवारा दिला, अशा शब्दांत माजी राज्यमंत्री व ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिवरकर यांनी रमेश बागवे यांच्या कामाबद्दल मंगळवारी गौरवोद्वगार काढले.
याशिवाय बागवे यांना प्रशासकीय आणि विधानसभेच्या कामाचा अनुभव, तसेच विकासाची दूरदृष्टी आहे. त्यांना कॅन्टोन्मेंटच्या प्रश्नांची जाण आहे. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास, तसेच या भागातील धार्मिक व सामाजिक ऐक्य जपण्यासाठी बागवे यांना विजयी करणे आवश्यक आहे, असे आवाहन शिवरकर यांनी केले. महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या पदयात्रेत ते बोलत होते.
दादापीर दर्गा येथे चादर चढवून, तसेच भवानीमाता मंदिर आणि बालाजी मंदिर येथे दर्शन घेऊन बनकर तालीम, सरस्वती सोसायटी, दुल्हा- दुल्हन कब्रस्तान, जिज्ञासा एसआरए वसाहत, पत्र्याची चाळ, राजेवाडी झोपडपट्टी, पवार वाडा, इस्लामपुरा आणि नाना पेठ या भागांत ही पदयात्रा काढण्यात आली.
या वेळी बागवे यांनी फळविक्रेते, रिक्षाचालक, दुकानदार, व्यापारी, स्थानिक मंडळांचे कार्यकर्ते, स्वच्छता कर्मचारी, महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांशी, तसेच मुस्लिम समाजाशी संवाद साधून कॅन्टोन्मेंटच्या विकासाचे वचन दिले. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डॉ. अमोल देवळेकर, तसेच माजी नगरसेवक अविनाश बागवे, रफिक शेख, उस्मान तांबोळी, चेतन अग्रवाल, बाशूभाई शेख, सुनील घाडगे, बुधाजी मोरे, संजय सोनवणे, गौतम कांबळे, अक्षय अवचिते, विठ्ठल थोरात, अमजद शेख यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते