जिल्हा बॅंकेच्या शाखांची कनेक्‍टिव्हिटी गूल

पाच दिवसांपासून कामकाज बंद ः कर्मचाऱ्यांना जावे लागतेय रोषाला सामोरे

टाकळी ढोकेश्‍वर (वार्ताहर) – पारनेर तालुक्‍यातील जिल्हा सहकारी बॅंकेच्या 55 ते 60 शाखांची कनेक्‍टिव्हिटी गेल्या पाच दिवसांपासून गूल झाली आहे. त्याचा मोठा फटका ग्राहकांना बसत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या रोषाला कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.

बुधवारी (दि.3) झालेल्या निसर्ग चक्रीवादळानंतर जिल्हा सहकारी बॅंकेच्या 55 ते 60 शाखांची कनेक्‍टिव्हिटी बंद पडली आहे. त्यामुळे त्याचा ग्राहकांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे ग्राहकांनी जिल्हा सहकारी बॅंकेच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे सर्व कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या रोषाला तब्बल पाच दिवसांपासून सामोरे जावे लागत आहे.

गेल्या सहा वर्षांनंतर प्रथमताच रोहिणी नक्षत्रामध्ये सर्वत्र थोड्या फार प्रमाणात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतीच्या मशागतीच्या कामास वेग आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बी-बियाणे खरेदीसाठी पैशांची गरज भासत आहे. ऐन पेरणीच्या काळातच 3 जूनपासून जिल्हा सहकारी बॅंकेच्या जवळपास 55 ते 60 शाखांची कनेक्‍टिव्हिटीच गूल झाली असल्याने ग्राहकांना स्वतःच्या खात्यावर पैसे असून देखील काढता येत नाहीत. त्यामुळे जिल्हा सहकारी बॅंकेच्या कामकाजाबद्दल शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

विविध कार्यकारी सेवा संस्थेचे पीक कर्जाचे अनेक शेतकऱ्यांना धनादेश मिळाले आहेत. हे धनादेश वटविण्यासाठी सदर शेतकरी गेल्या चार दिवसांपासून बॅंकेच्या शाखांत चकरा मारत आहेत. मात्र कनेक्‍टिव्हिटी नसल्याने त्यांना पैस मिळत नसल्याने ते त्रस्त झाले आहेत. याला कनेक्‍टिव्हिटीसाठी नियुक्त डाटा सेट्रल कंपनी की प्रशासन? असा सवाल ग्राहकांमधून केला जात आहे. तसेच पर्यायी उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.