सोमेश्वरनगर(प्रतिनिधी) – पंधरा वर्षांपासून ग्रामीण भागाचा आर्थिक कणा बनलेल्या बचत गटांमुळे महिलांची सक्षमीकरणाकडे वाटचाल सुरू आहे. महामारीच्या गर्तेत गेलेल्या महिला बचत गटांनी ऑनलाइनची बैठक घेत गरजा पूर्ण केल्या आहेत. करंजेपूल येथील बचत गटांचे सदस्य देशभरात विखुरलेले आहेत. त्यांना ऑनलाइनच्या माध्यमातून एकत्रित करीत बैठक घेतली आहे. त्यामुळे बारामती तालुक्यातील करंजेपूल येथील महिला बचत गट हायटेक झाली आहे.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1325069451166090/
करंजेपूल येथील आजी- माजी सैनिक स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा अमरजा आळंदीकर यांना बचत गटाचा वार्षिक आढावा व महिलांना हिशेब व वर्षभरातील कामकाज सांगायचे होते. त्यांनी सचिव वृषाली गायकवाड यांच्यापुढे विचार मांडला. त्यानंतर झूमवर ऑनलाइन बैठक घ्यायची ठरली. यात 80 टक्के महिला सहभागी झाल्या. ऑनलाइन बैठकीत अध्यक्षा अमरजा आळंदीकर यांनी लेखाजोखा मांडला. बचत गटाचे सदस्य आजी- माजी सैनिक आहेत.
काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हे सदस्य आहेत. आळंदीकर यांनी बचत गटाच्या वाटचालीत सर्व बचत गटांच्या समन्वय समिती सदस्य अनिल शिंदे, बाळासाहेब शेंडकर, गणेश आळंदीकर, जगन्नाथ लकडे आदींची मदत होत असल्याचे सांगितले. वर्षा शिंदे, श्रीकांत शेंडकर यांनी कामाबद्दल माहिती दिली. करंजेपूल, वाघळवाडी व ग्रामीण भागात सैनिक संघटनांचे सात बचत गट आहेत. आजी- माजी सैनिक स्वयंसहायता महिला बचत गट आहेत. हा गट मागील सव्वा वर्षांपासून कार्यरत आहे.