पीएमपीचे सर्व भांडार विभाग ‘कनेक्‍ट’ करणार

मुख्य कार्यालयाशी इंटरनेटद्वारे जोडण्याची योजना


स्पेअरपार्ट पुरवठ्यात ताळमेळ ठेवण्यासाठी निर्णय

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाचे शहरातील डेपोंमधील भांडार विभाग इंटरनेटच्या साहाय्याने मुख्य कार्यालयाशी जोडण्यात येणार आहे. ही यंत्रणा लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती पीएमपीएमएल प्रशासनाकडून देण्यात आली.

ऑनलाईन यंत्रणा “कनेक्‍ट’ करण्यासाठी “सीआयआरटी’ संस्थेच्या वतीने पीएमपीएमएलला सहकार्य करण्यात येणार आहे. ही यंत्रणा कशी काम करेल, कशापद्धतीने भांडार विभाग जोडण्यात येणार आहे, याबाबत संस्थेकडून नुकतेच प्रशासनाला प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

स्वारगेट, कात्रज, कोथरूड, न.ता.वाडी, हडपसर, मार्केटयार्डसह शहरामध्ये असणाऱ्या एकूण तेरा डेपो आहेत. यातील प्रत्येक डेपोला पीएमपीएमएलच्या मुख्यालयातील भांडार विभागाकडून स्पेअरपार्टचा पुरवठा करण्यात येतो. अनेकदा तेरा डेपोंमधील भांडार विभागांची माहिती समन्वय नसल्याने अनेकदा मुख्यालयापर्यंत पोहोचत नाही. बऱ्याचदा अधिकाऱ्यांच्या माहितीवर अवलंबून राहावे लागते. मात्र आपल्या डेपोमध्ये साहित्य कमी पडू नये, या कारणाने मुख्यालयापर्यंत योग्य माहिती पोहोचत नाही. परिणामी, इतर डेपोमध्ये सुट्ट्या भागांअभावी बसेस बंद राहतात, यामुळे भांडार विभाग संपूर्ण जोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

डेपो इंटरनेटने जोडल्याने प्रत्येक डेपोमधील भांडारामध्ये असणाऱ्या स्पेअरपार्टची तुटवडा, स्पेअरपार्टची आवश्‍यकता आदी गोष्टींबाबत आता थेट मुख्यालयात माहिती समजणार आहे. नव्याने बसवण्यात येणाऱ्या या यंत्रणेमुळे वारंवार होणाऱ्या स्पेअर पार्टमध्ये होणाऱ्या गैरव्यवहार आणि सावळ्या गोंधळाला आळा बसणार असल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.