मुंबई -विधानसभा निवडणुकीत विविध अनियमितता घडल्याच्या आरोपावर कॉंग्रेस ठाम आहे. त्यातून त्या पक्षाने २५ जानेवारीला राज्यव्यापी निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा आणि तालुका स्तरांवर ती निदर्शने होतील.
राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून निदर्शने केली जाणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत दिली. निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने निवडणुका घेणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे.
मात्र, सध्या ज्या पद्धतीने निवडणुका होत आहेत; त्यामुळे आयोगाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप आणि निवडणूक आयोगाने मतांवर दरोडा टाकून लोकशाहीचा गळा घोटला.
त्यामुळे लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी, मतदारांच्या हक्कासाठी आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून जनजागृती करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या निकालांमधून परस्परविरोधी चित्र समोर आले. लोकसभा निवडणुकीत सत्तारूढ महायुतीची मोठी पीछेहाट झाली.
मात्र, विधानसभा निवडणुकीत महाविजय मिळवून महायुतीने राज्याची सत्ता राखली. कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्षांचा समावेश असणाऱ्या महाविकास आघाडीकडून त्या निकालाच्या अनुषंगाने विविध प्रकारची साशंकता व्यक्त केली जात आहे.