नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी बदनामीच्या एका खटल्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे चिरंजीव विवेक डोवाल यांची माफी मागितली आहे. कारवान मॅगझिन आणि जयराम रमेश यांच्या विरोधात विवेक डोवाल यांनी दिल्ली न्यायालयात बदनामीचा गुन्हेगारी स्वरुपाचा खटला दाखल केला होता.
जयराम या मासिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखाच्या आधारे जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेल्या वक्तव्याला विवेक डोवाल यांनी आक्षेप घेऊन हा बदनामीचा खटला दाखल केला होता.
ज्या लेखाच्या आधारे आपण ही वक्तव्ये केली होती, त्याची त्रयस्थ यंत्रणेच्या माध्यमातून शहानिशा करून घ्यायला पाहिजे होती, असे रमेश यांनी आपल्या माफीनाम्यामध्ये म्हटले आहे. निवडणूका जवळ आलेल्या असल्याने आणि लेखामध्ये उचलण्यात आलेल्या मुद्दयांमध्ये तथ्य असल्याचे वाटल्याने आपण ही वक्तव्ये केली होती.
मात्र या वक्तव्यामुळे विवेक डोवाल अणि त्यांच्या कुटुंबाला झालेल्या मनस्तापाबद्दल आपण दिलगीर आहोत, असेही रमेश यांनी म्हटले आहे. अतिरिक्त मुख्य महानगर दंडधिकारी सचिन गुप्ता यांच्या समोर झालेल्या सुनावणी दरम्यान विवेक डोवाल यांनी ही माफी स्वीकारली आणि न्यायालयाने हे प्रकरण बंद केले. मात्र ज्या मासिकातील लेखावरून हे प्रकरण सुरू झाले, त्या मासिकाविरोधातील खटला सुरूच राहणार आहे.
विवेक डोवाल हे कायमन आयलंडमध्ये “हेज फंड’ चालवत असून त्याची नोंदणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी जाहीर करण्याच्या 13 दिवस आगोदर करण्यात आली आहे. “डी कंपनी’ने असे म्हटले असल्याचा दावा या लेखामध्ये करण्यात आला होता.