मध्य प्रदेशपाठोपाठ कर्नाटकातही कॉंग्रेसच्या डोकेदुखीत वाढ

राज्यातील नेतृत्वावर टीका करणाऱ्या आमदाराला कारणे दाखवा नोटीस

बंगळूर -मध्य प्रदेशपाठोपाठ कर्नाटकातही कॉंग्रेसच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. कर्नाटकातील कॉंग्रेसच्या एका आमदाराने पक्षाच्या राज्यातील नेतृत्वावर सडकून टीका केल्याने पक्षाची मोठीच गोची झाली. त्यातून संबंधित आमदाराला पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली.

मध्य प्रदेशातील कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात असल्याचा दावा भाजपने सोमवारी केला. एवढेच नव्हे तर, सरकारने बहुमत सिद्ध करावे, अशी मागणीही भाजपकडून करण्यात आली. ते कमी म्हणून की काय कॉंग्रेस सत्तेत असलेल्या कर्नाटक या दुसऱ्या राज्यात पक्षांतर्गत धुसफूसीने कळस गाठल्याचे स्पष्ट झाले. आमदार असणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रोशन बेग यांनी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव आणि प्रभारी के.सी.वेणुगोपाल यांना लक्ष्य करताना शेलकी विशेषणे वापरली. लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये सत्तारूढ जेडीएस-कॉंग्रेस आघाडीची पीछेहाट होईल, असे भाकीत एक्‍झिट पोलने वर्तवले आहे. त्याचा संदर्भ घेत पीछेहाटीला ते तीन नेते जबाबदार असल्याचे बेग यांनी म्हटले. बेग यांनी राव यांचा उल्लेख फ्लॉप शो, तर वेणुगोपाल यांचा उल्लेख विदूषक म्हणून केला.

बेग यांच्या वक्तव्याचे स्वागत कॉंग्रेसचा मित्रपक्ष असणाऱ्या जेडीएसचे प्रदेशाध्यक्ष ए.एच.विश्‍वनाथ यांनी केले. बेग यांचे वक्तव्य खरे आणि वास्तवाला धरून असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे मित्रपक्षांमधील संबंध ताणले जात असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कर्नाटकमधील आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावा भाजपकडून केला जात आहे. त्यापार्श्‍वभूमीवर, कॉंग्रेस आणि जेडीएसमधील घडामोडी आघाडी सरकारच्या दृष्टीने प्रतिकूल ठरण्याचीच चिन्हे आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×