कॉंग्रेसची चिंता आणि चिंतन (अग्रलेख)

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर कॉंग्रेसच्या कार्यकारी समितीच्या शनिवारी झालेल्या बैठकीत या पराभवावर चिंतन करण्यात आले. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊ केला होता, असेही बोलले जात आहे. दुसरीकडे महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे आणि देशात जिथं-जिथं कॉंग्रेसला अपयश आले आहे तेथील सर्व प्रदेशाध्यक्षांनीही राजीनामे द्यावेत, असे मतही त्यांनी मांडले आहे.

सलग दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत बसलेला हा पराभवाचा झटका कॉंग्रेसची चिंता वाढवणारा आणि पक्षाला चिंतन करायला भाग पाडणारा निश्‍चितच आहे. लोकसभा निवडणुकीत 542 पैकी कॉंग्रेसला 52 जागा मिळाल्या आहेत. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाडमधून दणदणीत विजय मिळवला असला तरी परंपरागत अमेठी मतदारसंघ त्यांना राखता आला नाही. या वेळी लोकसभा निवडणुकीत 19 राज्यांमध्ये कॉंग्रेसला खातेही उघडता आले नाही. पण या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी पद सोडण्याची काहीही गरज नाही आणि त्याचा पक्षाला कोणताही फायदा होणार नाही. उलट राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीत पक्षाला आणखी तोटा होण्याचीच शक्‍यता आहे. याच राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथे सत्ता मिळवून दिली होती आणि गुजरात, कर्नाटकात दमदार कामगिरी केली होती हे विसरता येणार नाही. त्यामुळेच पराभवाचे चिंतन करताना कॉंग्रेस नेत्यांनी आपली रणनीती कोठे चुकली याचा शोध घेण्याची गरज आहे.

नेते बदलून आणि नवे नेते आणून काहीही साध्य होणार नाही. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या रूपाने कॉंग्रेसला आश्‍वासक चेहरा मिळाला असताना विनाकारण एक कर्मकांड म्हणून पक्ष संघटनेत बदल करण्यात काहीच अर्थ नाही महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटल्याप्रमाणे कॉंग्रेसच्या पराभवाला फक्‍त राहुल गांधी जबाबदार आहेत, असे म्हणणे चूक आहे. देशात सर्व ठिकाणी पक्षाचा पराभव झाला आहे आणि त्याची कारणे शोधण्याची गरज आहे. ज्या राज्यांत कॉंग्रेसला विधानसभेत सत्ता मिळाली होतो त्या राज्यांमधील मतदारांनी लोकसभेत पक्षावर विश्‍वास का दाखवला नाही याचाही शोध घ्यावा लागेल.

प्रचाराच्या कालावधीत मांडण्यात आलेले मुद्दे, समविचारी पक्षांशी युती करण्यात आलेले अपयश, पक्ष संघटनेला आलेली मरगळ आणि निवडणुकीचे व्यवस्थापन करण्याच्या कौशल्याचा अभाव हीच कारणे सध्यातरी दिसत आहेत. अनेक राज्यांत समविचारी पक्षांशी मैत्री करण्यात आलेले अपयश कॉंग्रेसला आणि इतर पक्षांनाही अपयश देऊन गेले. वंचित बहुजन आघाडीमुळे महाराष्ट्रात कॉंग्रेचे मोठे नुकसान झाले आहे. पक्षाचे किंवा आघाडीचे 9 ते 10 उमेदवार त्यांच्यामुळे हरले आहेत. वंचित बहुजन आघाडीला कॉंग्रेस आघाडीत स्थान मिळाले असते तर असे चित्र दिसले नसते. उत्तर प्रदेशात समाजवादी व बहुजन समाज पक्षाशी जुळवून न घेता प्रियांका गांधींच्या करिष्म्यावर लोकसभा निवडणूक लढविण्याचा हट्ट धरणाऱ्या कॉंग्रेसला उत्तर प्रदेशात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

कॉंग्रेसने दिल्लीतही केजरीवाल यांचा मैत्रीचा हात नाकारून चूक केली. अर्थात हा चुकलेल्या रणनीतीचा एक भाग असला तरी दुसरीकडे या निवडणुकीत प्रचारासाठी राहुल यांना इतर नेत्यांची साथ मिळाली नाही ही बाबही लक्षात घ्यायला हवी. राहुल यांनी देशभर प्रचारदौरे केले; पण राहुल यांच्याशिवाय पक्षात दुसरा कोणताही स्टार प्रचारक नव्हता. प्रियांका गांधी यांनी स्वतःला उत्तर प्रदेशातच बंदिस्त करून घेतले होते. भाजपकडे ज्याप्रमाणे प्रचारसभा गाजवणाऱ्या नेत्यांची फौज होती तशी फौज कॉंग्रेसकडे नव्हती. महाराष्ट्रात कॉंग्रेसने कधीच प्रचारात आघाडी घेतली नव्हती. कॉंग्रेसचा सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार वयाच्या 78 व्या वर्षांतही 79 सभा घेण्याची धमक दाखवू शकले; पण राज्यातील कॉंग्रेस नेत्यांनी किती मेहनत घेतली हा संशोधनाचा विषय ठरू शकेल.

कॉंग्रेसने विरोधीपक्ष नेतेपद दिलेले राधाकृष्ण विखे पाटील ऐन निवडणुकीत पक्षापासून दूर झाले होते. इतर राज्यांमध्येही कॉंग्रेस पक्ष संघटनेची अशीच स्थिती होती. कोणीही मनापासून प्रचार केला नाही. राहुल गांधी आपल्या सभांमधून जो मुद्दा मांडत होते तो मुद्दा पुढे रेटण्याचे साधे कष्टही कोणी घेतले नाहीत. राफेल मुद्दा असो किंवा इतर विषय असोत आपापल्या पातळीवर हे विषय अधिक पेटवण्यात कॉंग्रेस नेत्यांना अपयश आले. कॉंग्रेसच्या प्रचारात कोठेही नियोजन नव्हते. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पश्‍चिम बंगाल आणि ओडिशात कोणत्याही परिस्थितीत यश मिळवायचेच असे नियोजन केले होते. कॉंग्रेसकडे असे कोणतेही टार्गेट होते असे कधीच दिसले नाही. राहुल गांधी यांनी प्रचारासाठी खूप मेहनत घेतली असली तरी त्यांच्या भाषणांमधून अनेक मुद्दे पुन्हा पुन्हा सांगितले गेले.

“चौकीदार चोर है’ ही प्रचारमोहीमही मतदारांना पसंत पडली नाही, असे आता स्पष्ट होत आहे. आपली प्रचाराची लाइन चुकत आहे हे पक्षाच्या वेळीच लक्षात आले नाही. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने बालाकोटमध्ये हवाईहल्ला करून जे प्रत्युत्तर दिले त्याचा सर्वाधिक फायदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि पर्यायाने भाजपाला होईल ही गोष्ट लक्षात न घेतल्याने कॉंग्रेसने वेगळ्याच मुद्द्यांवर प्रचार केला. आगामी काळात कॉंग्रेसच्या व्यासपीठावर या सर्व मुद्द्यांचा विचार होईलच.

लवकरच महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यावेळी निवडणुकीची रणनीती ठरवताना कोणतीही गफलत होणार नाही याची दक्षता पक्षाला घ्यावी लागेल. प्रत्येकच पक्ष निवडणुकीतील यश किंवा अपयश याचे चिंतन करीत असतो. कॉंग्रेससारख्या देशातील सर्वात जुन्या पक्षाला एकाचवेळी चिंता आणि चिंतन करावे लागत आहे, ही खेदाची बाब आहे; पण राखेतून उठणाऱ्या फिनिक्‍स पक्ष्याप्रमाणे कॉंग्रेसमध्येही ती ताकद आहे. त्यामुळेच पराभव मागे टाकून नव्या उमेदीने पुढे जाण्याचा संदेश या चिंतनातून कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना मिळाला तरी पुरेसे आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×