भोर (पुणे) -राज्यात महाविकास आघाडीचे काम चांगले आहे; परंतु तालुका व गाव पातळीवर होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका कॉंग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केले.
शनिवारी (दि. 19) येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या हॉलमध्ये तालुक्यातील 74 ग्रामपंचायतीच्या कार्यकर्त्यांच्या या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. यावेळी तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनवणे, कृष्णा शिनगारे, गीतांजली शेटे, बाळासाहेब शिंदे, महेश टापरे, पांडुरंग धोंडे, नंदा जाधव, जि. प. सदस्य विठ्ठल आवाळे, अनिता गावडे, अनिल सावले, पंचायत समिती सदस्य रोहन बाठे, अनिता दामगुडे यांच्यासह कॉंग्रेस पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार थोपटे म्हणाले, गावचा कारभारी निवडून देण्याची संधी आली आहे. कोणताही राजकीय भेदभाव न ठेवता गावच्या विकास कामासाठी गावांना निधी दिला आहे. करोना संसर्गामुळे व सध्या आचारसंहितेमुळे तालुक्यातील अनेक ठिकाणच्या रस्तेदुरुस्ती अडचणीत आहे; परंतु रस्ते दुरुस्तीची कामे मंजूर आहे. प्रत्येक गावातील कॉंग्रेस विचारधारेच्या लोकांना एकत्र घेऊन काम करा 74 ग्रामपंचायती आपल्या होतील. काही अडचणी गाव पातळीवर आल्या तर आपण ते प्रश्न बसून मिटवू. या निवडणुका आपण विकासकामांच्या जोरावर लढवू. फक्त तुम्ही केलेली विकासकामे जनतेसमोर ठेवा. गावचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी या निवडणुका महत्त्वाच्या आहेत.
- मार्गदर्शन केंद्र
भोर तालुक्यातील 74 ग्रामपंचायतीच्या निवडणुका उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बुधवारपासून (दि. 23) प्रक्रिया सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर तालुका कॉंग्रेस पक्षाच्या वतीने येथील आमदार संग्राम थोपटे यांच्या रायरेश्वर या कार्यालयाच्या ठिकाणी इच्छुक उमेदवार उमेदवारी अर्ज भरून घेणे व मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे.