नगर, -कॉंग्रेसही आता हायटेक होणार आहे. करोनामुळे पक्षाने डिजिटल व्यासपीठचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. भाजपला मिसकॉल देणारा पक्ष म्हणून टीका करणाऱ्या कॉंग्रेसने आता भाजपबरोबरीने मोबाईल ऍपच्या माध्यमातून सभासद नोंदणी अभियान सुरू केले आहे. दि. 7 फेब्रुवारीपासून सुरू होणारे अभियान 31 मार्चपर्यंत चालणार आहे.
जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबविण्यात येणार असून त्यासाठी खास सभासद नोंदणी ऍप तयार करण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोरमधून एआईसीसी मार्फत ऍप डाऊनलोड करता येणार आहे. जिल्हाध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, मुख्य नोंदणी अधिकारी, बूथ नोंदणी अधिकारी व सदस्य नोंदणी या पद्धतीने सभासद नोंदणी केली जाणार आहे.
प्रत्येक तालुक्यात जिल्हाध्यक्ष ब्लॉक अध्यक्ष नियुक्त करणार असून हे ब्लॉक अध्यक्ष प्रत्येक जिल्हा परिषद गट निहाय मुख्य नोंदणी कर्ताची नियुक्त करणार आहेत. प्रत्येक बूथवर एक महिला व एक पुरुषाची बूथ नोंदणीकर्ते म्हणून नेमणूक होणार आहे. त्याप्रमाणे महापालिका व नगरपालिका कार्यक्षेत्रात प्रत्येक प्रभागात मुख्य नोंदणीकर्ता नियुक्त होईल. त्याच्यामार्फत बूथवर बूथ नोंदणीकर्तेची नेमणूक होणार आहे.
सर्व प्रक्रिया सभासद नोंदणी ऍपच्या माध्यमातून होणार असल्याने आखिल भारतीय कॉंग्रेसला प्रत्येक नोंदणीकर्ताची कामकाजाची माहिती मिळणार आहे. या ऍपच्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्त्याची माहिती पक्षापर्यंत पोहचणार असून पक्षाच्यावतीने स्वतंत्र वेबसाइट देखील तयार होणार आहे. पक्षाचा सभासद होणाऱ्या प्रत्येक सभासदाला प्लास्टिक डिजिटल कार्ड देण्यात येणार आहे. त्यावर सभासदाचा फोटो राहणार आहे. या ऍपमुळे प्रत्येक जिल्हा व गावपातळीवरील माहिती पक्षापर्यंत पोहचणार असल्याने कोणी काय काम केले हे समजणार आहे.