भाजपचा बालेकिल्ला जिंकण्यासाठी कॉंग्रेसला हवीय सलमानची मदत

इंदूर मतदारसंघात प्रचार करण्यासाठी घातली गळ

भोपाळ -भाजपचा बालेकिल्ला जिंकण्यासाठी कॉंग्रेसला चक्क बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेते सलमान खान याची मदत हवी आहे. त्यासाठी कॉंग्रेसने सलमानला मध्य प्रदेशातील इंदूर लोकसभा मतदारसंघात प्रचार करण्याची गळ घातली आहे.

मध्य प्रदेशातील सर्वांत मोठे शहर असणाऱ्या इंदूरची ओळख त्या राज्याची व्यावसायिक राजधानी म्हणून आहे. इंदूर लोकसभा मतदारसंघ 1989 पासून भाजपच्या ताब्यात आहे. त्या वर्षी लोकसभेच्या विद्यमान सभापती सुमित्रा महाजन यांनी त्या मतदारसंघात विजय मिळवला. तेव्हापासून आठवेळा खासदार बनलेल्या महाजन यांनी तो मतदारसंघ भाजपकडे राखण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात प्रदीर्घ काळानंतर सत्तेवर आलेल्या कॉंग्रेसने इंदूर जिंकण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठीच सलमानपुढे प्रचाराचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

सलमानचा जन्म इंदूरमध्ये 1965 साली झाला. त्याच्या बालपणीचा काही काळ इंदूरमध्ये व्यतीत झाला. त्याचा आधार घेऊन कॉंग्रेसने सलमानला प्रचाराची गळ घातली आहे. अजूनतरी सलमानने कॉंग्रेसच्या प्रस्तावाला कुठला प्रतिसाद दिलेला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.