नवी दिल्ली – दिल्ली कॉंग्रेसचे उपाध्यक्ष अली मेहदी आणि दिल्लीतील दोन नवनिर्वाचित नगरसेविकांनी शुक्रवारी आम आदमी पक्षात (आप) प्रवेश केला. त्यामुळे दिल्लीचे महापौरपद मिळवण्याची निश्चिती करण्यासाठी आपनेही इनकमिंगसाठी दार उघडल्याचे मानले जात आहे.
दिल्ली पालिका निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्या निवडणुकीत बाजी मारून आपने दिल्ली पालिकेतील भाजपची 15 वर्षांची सत्ता संपुष्टात आली. मात्र, त्यानंतरही भाजपच्या काही नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय सस्पेन्स निर्माण झाला. दिल्लीचा पुढील महापौर भाजपचाच असेल, असे त्यांनी म्हटले. त्यापाठोपाठ आपने भाजपकडून फोडाफोडीचे प्रयत्न सुरू झाल्याचा आरोप केला. अर्थात, आपचा कुठलाही नगरसेवक विकला जाणार नाही, असा विश्वासही त्या पक्षाने व्यक्त केला.
आता कॉंग्रेसच्या दोन नगरसेविकांना प्रवेश दिल्याने आप महापौरपद मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी करत असल्याचे स्पष्ट होत आहे. दिल्ली पालिकेत एकूण 250 जागा आहेत. त्यातील 134 जागा आपने, तर 104 जागा भाजपने जिंकल्या. कॉंग्रेसला केवळ 9 जागांवर समाधान मानावे लागले. अशात दोन नगरसेविकांच्या आप प्रवेशाने कॉंग्रेसला आणखी धक्का बसला आहे. तर, आपचे संख्याबळ वाढून 136 इतके झाले आहे. दिल्ली पालिकेसाठी पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही.
दिल्ली महापौरांची निवड केवळ नगरसेवक करत नाहीत. दिल्लीतील लोकसभेचे 7 आणि राज्यसभेचे 3 खासदार, विधानसभा सभापतींनी नियुक्त केलेले 14 आमदार यांनाही महापौर निवडीसाठी मतदान करण्याचा अधिकार आहे.