नगर – शहरातील निकृष्ट रस्त्याच्या कामांबाबत कॉंग्रेसने बुधवारी मध्यरात्री अनोखे आंदोलन केले. कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या मध्यवस्तीत शनी चौक ते होशिंग हॉस्पिटल दरम्यान प्रभाग क्रमांक 12 मध्ये महापालिकेने केलेला सिमेंटचा रस्ता अवघ्या चार-पाच महिन्यांमध्ये खराब झाला. या रस्त्यावर “भ्रष्टाचाऱ्यांना 70 टक्के, रस्त्याला 30 टक्के’ असे लिहीत कॉंग्रेसने नगरकरंच्यावतीने महापालिका, ठेकेदार, लोकप्रतिनिधींचा निषेध केला.
यावेळी आंदोलनात ब्लॉक कॉंग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, माजी नगरसेवक संजय झिंजे, शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड, इंजिनीयर सुजित क्षेत्रे सहभागी झाले होते. रस्त्याच्या कामांत 70 टक्के कमिशन खाणे सुरू आहे. केवळ 30 टक्केच रक्कम प्रत्यक्षात रस्त्यावर खर्च केली जाते. मग हे रस्ते कसे दर्जेदार तयार होतील, असा सवाल काळे यांनी यावेळी केला. हा वर्दळीचा रस्ता आहे.
भिंगारवाला चौक ते कोतवाली पोलीस स्टेशन ते जुन्या मनपाच्या चौकापर्यंत रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. हा रस्ता व्हावा, अशी व्यापारी, नागरिकांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी प्रलंबित आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी महापालिकेने लोकप्रतिनिधींच्या आग्रहातून सिमेंट कॉंक्रिटीकरण करीत शनि चौक ते होशिंग हॉस्पिटल दरम्यानचा रस्ता पूर्ण केला होता. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र हा दिलासा औट घटकेचा ठरला असून रस्ता गायब झाला आहे.