अहमदाबाद – लोकसभा निवडणुकीत कामगिरी सुधारल्यानंतर कॉंग्रेसने गुजरात जिंकण्याचा संकल्प केला आहे. आता त्या राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी त्या पक्षाने सुरू केली आहे. त्याकडे कॉंग्रेसचे मिशन गुजरात म्हणून पाहिले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गृहराज्य असणाऱ्या गुजरातमध्ये प्रदीर्घ काळपासून भाजपची सत्ता आहे. त्या राज्यात मागील २ लोकसभा निवडणुकांत (वर्ष २०१४ आणि २०१९) भाजपने सर्वच्या सर्व जागा जिंकल्या.
मात्र, यावेळी १ जागा जिंकत कॉंग्रेसने सर्व जागा जिंकण्याची भाजपची हॅट्ट्रिक हुकवली. त्याशिवाय, देशात इतरत्रही कॉंग्रेसची कामगिरी उंचावली. त्यामुळे त्या पक्षाचा उत्साह दुणावला आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकताच गुजरातचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी २०२७ या वर्षातील विधानसभा निवडणूक जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला.
त्यापाठोपाठ कॉंग्रेसने गुजरात अभियानावर लक्ष केंद्रित केल्याचे सूचित होत आहे. पक्षाचे गुजरात प्रभारी मुकूल वासनिक बुधवारपासून तीन दिवस त्या राज्यात तळ ठोकणार आहेत. वासनिक त्यांच्या मुक्कामात पक्ष संघटनेला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी सज्ज करणार आहेत.
गुजरातमध्ये चालू वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या प्रारंभी महापालिका, जिल्हा पंचायतींच्या निवडणुका अपेक्षित आहेत. त्या निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करून विधानसभा रणसंग्रामाला सामोरे जाण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी करण्याची कॉंग्रेसची रणनीती आहे.