उत्तरप्रदेश रणधुमाळीसाठी कॉंग्रेस उभारणार वॉर रूम्स; प्रियांका गांधी यांची संकल्पना

लखनौ – उत्तरप्रदेशातील पुढील वर्षीची विधानसभा निवडणूक ताकदीने लढवण्याचा संकल्प कॉंग्रेसने केला आहे. त्या रणधुमाळीसाठी वॉर रूम्स उभारण्याची संकल्पना पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मांडली आहे.

उत्तरप्रदेश निवडणुकीसाठीच्या कॉंग्रेसच्या तयारीवर प्रियांका बारकाईने देखरेख ठेऊन आहेत. त्यातून त्या सातत्याने त्या राज्याचा दौरा करत आहेत. आता पाच दिवसीय दौऱ्यासाठी दाखल झालेल्या प्रियांका यांनी येथे पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली.

त्यावेळी त्यांनी जिल्हा पातळीवर पक्षाच्या वॉर रूम्स उभारण्याच्या गरजेवर भर दिला. त्या वॉर रूम्समधून स्थितीचा आढावा घेतला जाईल. त्याशिवाय, अचानकपणे पुढे आलेल्या मुद्‌द्‌यांवर तातडीने निर्णय घेणे शक्‍य होईल. गाव पातळीवर पक्ष संघटना पोहचवण्यासाठीच्या पाऊलांवरही प्रियांका यांनी चर्चा केली.

प्रचार मोहिमेवेळी कुठले मुद्दे वापरता येऊ शकतील याची चाचपणी संबंधित बैठकीत झाली. उत्तरप्रदेशात विधानसभेच्या एकूण 403 जागा आहेत. आगामी निवडणुकीत त्या सर्व जागा लढवण्याच्या दृष्टीने कॉंग्रेसने तयारी चालवली आहे. कुठल्या मोठ्या पक्षाशी हातमिळवणी न करण्याचा इरादा कॉंग्रेसने याआधीच बोलून दाखवला आहे. मागील वेळी कॉंग्रेसने समाजवादी पक्षाशी आघाडी केली. त्यावेळी 114 जागा लढवणाऱ्या कॉंग्रेसला अवघ्या 7 जागांवर विजय मिळवता आला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.