Harshvardhan Sapkal on Dhas-Munde Meeting | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे मागील काही महिन्यांपासून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेत दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी सातत्याने मागणी केली आहे. याशिवाय, त्यांनी या प्रकरणावरून धनंजय मुंडेंविरोधातही आवाज उठवला. मात्र, धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची गुप्त भेट झाल्याचे समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत.
मुंडे-धस भेटीवर आता काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. टीआरपी वाढवण्याकरता केलेले हे सगळं प्रकरण होते, असा आरोप सपकाळ यांनी केला आहे.
पहिले आका आका आका, बंदूक बंदूक बंदूक, रेती रेती रेती, टिप्पर टिप्पर टिप्पर असे शब्द रांगड्या भाषेत मांडले जात होते. मात्र आता हे शब्द मागे पडलेत आणि आता मांडवली मांडवली मांडवली, या शब्दाची गुंज या प्रकरणातून ऐकू येत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया या दोन्ही नेत्यांच्या भेटीवर बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.
सपकाळ म्हणाले की, सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट म्हणजे टीआरपी वाढवण्यासाठीचे हे प्रकरण होतं. कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्व कमी करण्यासाठी भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी सुरेश धस यांना सूचना दिली होती.
दरम्यान, मुंडेसोबत झालेल्या भेटीबाबत आमदार सुरेश धस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. धनंजय देशमुख आणि मस्साजोगचे नागरिक माझ्यासोबत आहेत. मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा भूमिका माझ्यासोबतच राहील. जोपर्यंत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असे धस म्हणाले.