मुंबई – राजस्थानच्या उपमुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी केलेल्या सचिन पायलट यांचे समर्थन करणे कॉंग्रेस प्रवक्ते संजय झा यांना चांगलेच महागात पडले आहे. पक्षविरोधी कारवाई आणि शिस्तभंग केल्याप्रकरणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी झा यांच्यावर निलंबन केल्याची कारवाई केली आहे.
पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून काढून टाकल्यानंतर झा यांनी ट्विट केले होते. 2013 ते 2018 ही पाच वर्षे सचिन पायलट यांनी कॉंग्रेससाठी रक्त, अश्रू, कष्ट आणि घाम गाळले. कॉंग्रेस 21 जागांसारख्या अत्यंत वाईट स्थितीतून 100वर परत आली. मात्र, आम्ही त्यांना नुकताच कामगिरीचा बोनस दिला.
आम्ही किती गुणग्राहक आहोत. आम्ही खूप पारदर्शक आहोत, असे उपरोधिक ट्विट त्यांनी केले होते. त्यानंतर एका वाहिनीवरील चर्चेत त्यांनी पुन्हा स्वपक्षावर हल्लाबोल चढवला होता. यानंतर बाळासाहेब थोरात यांनी झा यांच्यावर निलंबन केल्याची कारवाई केली आहे.
दरम्यान, संजय झा यांच्याकडे 2013 पासून कॉंग्रेसच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी होती. अनेक चर्चासत्रांमध्ये ते कॉंग्रेस पक्षाची बाजू मांडत असत. त्यांच्याकडे महाराष्ट्रातील अखिल भारतीय व्यावसायिक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती.