शेतकरी आंदोलनासाठी कॉंग्रेसची ‘सोशल मीडिया’ मोहीम

नवी दिल्ली – दिल्लीत सध्या जे शेतकरी आंदोलन सुरू आहे त्याला समर्थन मिळवण्यासाठी कॉंग्रेसने आता सोशल मीडिया मोहीम हाती घेतली आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, जेव्हा शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवतात तेव्हा संपूर्ण देशाचा आवाज त्यांच्या बाजूने उठवला गेला पाहिजे.

मोदी सरकारने पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या विरोधात काळे कायदे आणले आणि त्याच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांवर त्यांनी लाठ्या चालवल्या. पण जेव्हा शेतकरी आवाज उठवतो तेव्हा त्याचे पडसाद देशभर उमटतात हे मोदी सरकार विसरले आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तुम्ही शेतकऱ्यांसाठी आवाज उठवा असे आवाहन त्यांनी देशातील नागरिकांना ट्विटरवर केले आहे.

शेतकऱ्यांनी सत्यासाठी लढाई सुरू केली आहे. आपल्या अन्नादात्याच्या पाठिंब्यासाठी पुढे या असे आवाहनही राहुल गांधी यांनी केले आहे. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना अन्न पुरवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

शेतकरी कायद्याच्या संबंधात पंतप्रधानांनी मांडलेल्या भूमिकेवरही राहुल गांधी यांनी टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत, असे पंतप्रधान म्हणत आहेत. पण जर हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत तर शेतकरीच त्या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर का उतरला आहे, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.

मोदींच्या केवळ दोन-तीन मित्रांच्या हितासाठीच हे कायदे करून शेतकऱ्यांना फसवले गेले आहे, असाही आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळेच संपूर्ण देशाने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.