‘कॉंग्रेसने महापालिका निवडणुकीसह सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्यात’

माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी

हडपसर – राज्यात महाविकास आघाडी सत्तेत असल्याने आगामी काळातील निवडणुकाही शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्ष एकत्रितपणे लढतील, असे सुतोवाच ज्येष्ठ, श्रेष्ठ नेतेमंडळींकडून केले जात होते. परंतु, कॉंग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी कॉंग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवित पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र पाठवून आगामी सर्व निवडणुका कॉंग्रेसने स्वबळावर लढविण्याची मागणी कल्याने राजकीय घाडमोडींना वेग येणार आहे.

राज्यात नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका येत्या काही दिवसात होणार आहेत. या निवडणुका कॉंग्रेसने स्वबळावरच लढवाव्यात. त्याद्वारेच राज्यातील कॉंग्रेसची पक्षीय चौकट कायम राहील आणि कार्यकर्त्यांचा ओघही टिकवता येईल, असे ज्येष्ठ कॉंग्रेस नेते व माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी म्हटले आहे.

पुणे महापालिकेसह सर्व स्थानिक निवडणुका स्वबळावर लढण्याच्या मागणीचे निवेदन माजी मंत्री शिवरकर यांनी पक्ष अध्यक्ष सोनिया गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना पाठवले आहे.

शिवरकर यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात भविष्यकाळात कॉंग्रेस मजबूत करायची असेल तर स्वबळाचा नारा दिल्याशिवाय गत्यंतर नाही, कार्यकर्त्यांना निवडणुकीमध्ये पूर्णसंधी मिळावी. पंजा हे चिन्ह लोकांपुढे सतत राहावे यासाठी स्वबळाचा नारा गरजेचा असल्याचे शिवरकर यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.