सोलापूर – भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या शहीद दिनानिमित्त रविवारी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने सद्भावना दिन पाळण्यात येत आहे. या निमित्ताने निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यास कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. तसेच या मेळाव्याला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण मार्गदर्शन करणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी दिली.
हा निर्धार मेळावा रविवारी सकाळी साडेअकरा वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात होणार आहे. या मेळाव्यास आमदार बाळासाहेब थोरात, आमदार प्रणिती शिंदे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांच्यासह कॉंग्रेस पक्षाचे माजी मंत्री आमदार पदाधिकारी व नेते उपस्थित राहणार आहेत.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते आमदार प्रणिती शिंदे यांच्या फंडातून उभारलेल्या एमपीएससी, यूपीएससी कोचिंग ट्रेनिंग सेंटर या पोलीस मुख्यालयासमोरील वास्तूचे उद्घाटन तसेच शुभराय आर्ट गॅलरीचे नवनिर्माण अंतर्गत नाविन्यपूर्ण मराठी भवन वास्तूचे भूमिपूजन ही होणार आहे. या निर्धार मेळाव्यामध्ये अनेक दिग्गज मंडळींचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याचेही शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सांगितले.