भोपाळ – मध्य प्रदेशातील आगामी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्ष सज्ज झाला आहे. पोटनिवडणूक जाहीर होण्याआधीच कॉंग्रेसने विधानसभेच्या 27 पैकी 15 जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत.
कॉंग्रेसच्या 25 आमदारांनी दिलेले राजीनामे आणि 2 आमदारांचा मृत्यू यांमुळे मध्य प्रदेशातील विधानसभेच्या 27 जागा रिक्त आहेत. त्यामुळे त्या राज्यात पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीबरोबर इतर पोटनिवडणुका घेण्याचे सूतोवाच निवडणूक आयोगाकडून याआधीच करण्यात आले. त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मध्य प्रदेशातील पोटनिवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. ती विचारात घेऊन कॉंग्रेस पक्ष सरसावला आहे.
सत्तेवरून पायउतार व्हावे लागल्याचा वचपा पोटनिवडणुकीत काढण्याचा कॉंग्रेसचा निर्धार आहे. त्यातून निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवार जाहीर करण्याचा एरव्हीचा पायंडा मोडत त्या पक्षाने खूप आधीच उमेदवार निश्चित केले आहेत. काही महिन्यांपूर्वी पक्षांतर्गत बंडखोरीमुळे कॉंग्रेसच्या हातून मध्य प्रदेशची सत्ता गेली.
तरुण नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे समर्थक असणाऱ्या 22 आमदारांनी राजीनामे दिले. त्यामुळे मध्य प्रदेशची सत्ता पुन्हा काबीज करण्याचा भाजपचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर कॉंग्रेसच्या आणखी 3 आमदारांनी विधानसभा सदस्यत्व सोडले.