भ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण

पुणे – आगामी लोकसभा निवडणूक जवळ आल्याने आता शिवसेना-भाजप युतीचा प्रश्न सुटला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर आता मुंबईतील पत्रकार परिषदमध्ये युतीबाबतची घोषणा काही वेळात करणार आहेत. त्यानंतर आता विरोधी पक्षांकडून भाजप-शिवसेना युतीबाबत टीका करण्यात येत आहे.

भाजप-शिवसेना युतीबाबत काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जोरदार टीका केली आहे. चव्हाण यांनी म्हटले आहे की, आज भ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती झाली. उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार अफजल खान उर्फ अमित शाह व अमित शाह यांच्या म्हणण्यानुसार उंदीर उर्फ उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केली आहे. ही राफेल चोर आणि लाचाराची युती आहे .

पुढे बोलताना अशोक चव्हाण म्हटले की, वारंवार अनेक वेळा शिवसेना स्वबळावर लढणार असून भाजपशी युती करणार नाही अशा पोकळ घोषणा केल्या होत्या. युती गेली चुलीत असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. आज उद्धव ठाकरेंनी स्वतःचा स्वाभिमान चुलीत घातला आहे आणि भाजपासमोर लोटांगण घातले आहे. अशा कठोर शब्दात काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी भाजप-शिवसेना युतीवर टीका केली आहे.

गेल्या साडेचार वर्षात भाजप शिवसेना या दोन्ही पक्षांनी राज्याचे वाटोळे केले आहे. या राज्यातील १७ हजार शेतक-यांच्या आत्महत्यांना भाजपासोबत शिवसेना ही जबाबदार आहे. कुपोषणामुळे झालेल्या हजारो बालकांच्या मृत्यूला भाजपाइतकीच शिवसेनाही जबाबदार आहे, अशीही टीका अशोक चव्हाण यांनी  भाजप-शिवसेना यांच्यावर केली आहे.

भाजप सरकारच्या काळात महिलांवरील वाढलेले अत्याचार, भ्रष्टाचार व बेरोजगारींची समस्या हे भाजप आणि शिवसेना या दोघांचेही पाप आहे. आपण दोघे भाऊ महाराष्ट्राला लुटून खाऊ अशा पद्धतीने या दोन्ही पक्षांनी महाराष्ट्राला लुटले आहे.

https://twitter.com/INCMaharashtra/status/1097509989600583680

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)