कॉंग्रेसची राष्ट्रवादीसोबत बुधवारी बैठक

किमान समान कार्यक्रमला अंतीम सरूप मिळणार; कॉंगेसचे खर्गे चर्चा करणार

नवी दिल्ली : महाराष्ट्र सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी किमान समान कार्यक्रमाला अंतिम रुप देण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची बुधवारी बैठक होणार आहे. त्यामुळे राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्यास मदत होणार आहे. कॉंग्रेसच्या वतीने ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे या चर्चेत सहभागी होतील, असे संकेत मिळत आहेत.

सत्तेतील वाटा आणि किमान समान कार्यक्रम याबाबतच्या चर्चेसाठी अहनद पटेल यांचीही नियुक्ती करण्यात आली होती. मात्र ते या बैठकीस उपस्थित राहणार नाहीत, असे सूत्रांनी सांगितले. कोणताही शब्द द्यायचा नाही. आणि कोणतीही भूमिका स्वत:हून घ्यायची नाही, असे धोरण कॉंग्रेसने आखले असल्याचे पक्षाच्या वरीष्ठ सुत्रांकडून समजते.

पक्षाला सत्तास्थापण्याची कोणतीही घाई नाही, असे स्पष्ट करण्यात आले. सकाळी कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधीयांनी अहनद पटेल आणि मल्लिकार्जून खर्गे यांच्याशी महाराष्ट्रातील सरकार स्थापण्याबाबत चर्चा केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. सुमारे दीड तास झालेल्या चर्चेत महाराष्ट्र सरकारबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगून शरद पवार यांनी राजकीय वर्तुळात चर्चेला नवे आयाम मिळवून दिले होते. कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यासाठी चर्चेचे दरवाजे खुले असल्याचे संकेत दिले होते.

दरम्यान, उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आव्हान देणाऱ्या भाजपाची पाळेमुळे खणून काढू,असे आव्हान शिवसेनने दिले. राजकीय अरेरावीचा अंत होण्याची सुरवात झाली आहे, असे सांगत पक्षाचे मुखपत्र सामनामध्ये महंमद घौरीला अनेकदा जीवदान देणाऱ्या पृथ्वीराज चौहान यांची घौरीनेच हत्या केली याचा दाखला देत महाराष्ट्रात शिवसेने अशा कृतघ्न लोकांना सहन केले. आता ते आमच्या पाठीत खंजीर खुपसत आहेत, असे ते म्हणाले.

राज्यतील सध्याची राजकीय अस्थिरता संपुष्टात आणण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रावादी आणि शिवसेनेतील सात्तावाटपाचे सूत्र जवळपास निश्‍चित झाले आहे. मुख्ययमंत्री पदाबाबत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे ठाम आहेत. मात्र, कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही, असे धोरण त्यांनी ठरवले आहे, असे शिवसेनेतील सुत्रांनी सांगितले. दरम्यान कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक उपमुख्यमंत्रीपद आणि दोन्ही कॉंग्रेस ठरवतील तो विधानसभेचा अध्यक्ष अशी भूमिका घेण्यात आल्याची माहिती खात्रीलायकरित्या समोर येत आहे. बिगर भाजपा सरकार आणण्यामागे शरद पवार महत्वाची भूमिका साकारत आहेत, मात्र त्याबाबत स्वत:चे नाव ते जोडू इच्छित नाहीत, असे राष्ट्रवादीतील सूत्रांनी सांगितले.

दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, जिंदगी मे कुछ कामनेका है तो तरकिबे बदलो। इरादे नही। सोनिया गांधी यांची भेट घेऊन आल्यानंतर शरद पावार यांना सोमवारी संजय राऊत भेटले. त्यावेळी त्यांनी लवकरच महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार येईल असे सांगितले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.