लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 पूर्वीच काँग्रेसला राज्यात मोठा फटका बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते जितीन प्रसाद यांनी आज दिल्ली येथे भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत प्रसाद यांचा भाजप प्रवेश सोहळा पार पडला.
जितीन प्रसाद यांनी, काँग्रेसप्रणित यूपीए-2 सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. ते उत्तर प्रदेशातील काँग्रेसचा ब्राह्मण चेहरा म्हणून ओळखले जायचे. काँग्रेस पक्षामध्ये असताना त्यांनी पक्ष संघटनेतील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. काही महिन्यांपूर्वीच त्यांच्याकडे एआयसीसी बंगालच्या सचिव पदाची धुरा देण्यात आली होती.
2019 मधील लोकसभा निवडणुकांतील काँग्रेसच्या मानहानीकारक पराभवानंतर ते काँग्रेस नेतृत्वावर नाराज होते. काँग्रेस मधील नाराज जी-23 गटामध्ये देखील प्रसाद यांचा समावेश होता.
जतीन प्रसाद हे काँग्रेस नेते जितेंद्र प्रसाद यांचे पुत्र आहेत. 2001 मध्ये त्यांनी युवक काँग्रेसमधून आपल्या राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली होती. यानंतर 2004च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी शहाजानपुर मतदारसंघातून विजय मिळवला. हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. काँग्रेस प्रणित युपीए-2 सरकारमध्ये त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्याने ते मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्र्यांपैकी एक ठरले होते.
2009 लोकसभा निवडणुकीतही त्यांना विजय मिळाला. मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजपच्या रेखा वर्मा यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.