कांदा निर्यातबंदीच्या विरोधात कॉंग्रेसची निदर्शने

बुध-करोना संकटात जर्जर झालेल्या देशांतील शेतकऱ्यांनी प्रचंड मेहनतीने कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले. हा कांदा परदेशात निर्यात करून चार पैसे मिळवण्याची वेळ आली असताना केंद्र सरकारने अचानक निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याचे भाव कोसळले आहेत.

याविरोधात सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. मोदी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

कांदा निर्यातबंदी करून केंद्र सरकार कोणाचे हित साधत आहे? शेतकरी संकटात असताना त्यांच्याकडे लक्ष द्यायचे सोडून मोदी सरकार त्यांना आणखी संकटात ढकलत आहे, अशा भावना व्यक्‍त करून सरकारचा निषेध करण्यात आला.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तीन महिन्यांपूर्वी म्हणजेच 4 जून रोजी कांदा, बटाटा, डाळी जीवनाश्‍यक वस्तूंच्या यादीतून वगळण्यात आल्याची घोषणा केली होती. त्यानंतर तीनच महिन्यात मोदी सरकारने घूमजाव करत आपला निर्णय बदलला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर घोर अन्याय झाला आहे.

ही निर्यातबंदी तत्काळ मागे घ्यावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. बाबासाहेब कदम, बाळासाहेब शिरसाट, मनाजी घाडगे, मनोजकुमार तपासे, धनश्री महाडिक, सुषमा घोरपडे, मालन परळकर, नाना लोखंडे, राजेंद्र शेलार, बाबुराव शिंदे, अंकुश महामुलकर, अन्वर पाशा खान, ऍड. दतात्रय धनवडे, नरेश देसाई, शरद मोरे, अमर कारंजे, प्रकाश फरांदे, संतोष डांगे यांनी आंदोलनात भाग घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.