कॉंग्रेसच्या आजी-माजी नेत्यांची मागणी
नवी दिल्ली : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता अध्यक्षपदासाठी वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरू आहे. परंतु, पक्षातील आजी-माजी नेत्यांनी पक्षाचे अध्यक्षपद प्रियंका गांधी यांच्याकडे द्यावे अशी मागणी केली आहे. प्रियंका गांधी यांना आजी-माजी नेत्यांचा पुर्ण पाठिंबा असल्याचे सांगण्यात येत आहे.
केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते श्रीप्रकाश जैस्वाल यांनीदेखील प्रियंका गांधींनी पक्षाचे अध्यक्षपद स्विकारावे असे म्हटले आहे. तसेच सध्या पक्षाला एका खंबीर नेतृत्वाची गरज असून प्रियंका गांधी पक्षाला या बिकट परिस्थितीतून बाहेर काढण्यास मदत करतील अशी अपेक्षादेखील जैस्वाल यांनी व्यक्त केली. तर दुसरीकडे पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल शास्त्री यांनीदेखील प्रियंका गांधींना अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला आहे. कॉंग्रेसकडे प्रियंका गांधी यांच्यापेक्षा दुसरा कोणताही उत्कृष्ठ पर्याय नसल्याचे शास्त्री यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी दिलेला अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाने स्विकारलेला नाही.