नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची प्रकृती खालाविल्याने रविवारी (2 फेब्रुवारी) रात्री 7 वाजता त्यांना दिल्लीतली सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर अखेर आज (5 फेब्रुवारी) त्यांना डिस्चार्ज मिळाला. सध्या सोनिया गांधींच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पोटात इन्फेक्शन झाल्याने सोनिया गांधी यांना रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत पुत्र राहुल गांधी आणि कन्य प्रियांका गांधी वाड्राही उपस्थित होत्या. उपचारांनंतर सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचे म्हटले जात आहे. सोनियांच्या प्रकृतीत आता बरीच सुधारणा झाली असून त्यांची तब्येत स्थिर आहे, अशी माहिती डॉ. डी. एस. राणा यांनी दिली.
दरम्यान, सोनिया गांधी मागील अनेक वर्षांपासून आजारी आहेत. त्यांच्यावर अधूनमधून उपचारही सुरु असतात. त्यामुळे कॉंग्रेसच्या सभांमध्ये त्या फारशा दिसत नाहीत. सोनिया गांधी यांना अस्थमा असून त्यासाठी त्यांनी अमेरिकेत जाऊन उपचारही घेतले होते.