नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था चांगले रिटर्न्स देत असल्याच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दाव्याची कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी खिल्ली उडवली. अर्थमंत्र्यांचा दावा विसंगत स्वरूपाचा आहे. दूरदृष्टीचा अभाव असणाऱ्या मोदी सरकारने अर्थव्यवस्थेचे नुकसान केले. तसेच, भारतीयांचे जगणे अवघड बनवले, असे भाष्य त्यांनी केले.
शेअर बाजारांतून चालू वर्षात आतापर्यंत गुंतवणूकदारांचे ४५ लाख कोटी रूपयांचे नुकसान झाले. परदेशी गुंतवणूकदारांनी मागील वर्षीच्या ऑक्टोबरपासून १.५६ लाख कोटी रूपयांच्या शेअर्सची विक्री केली. त्यामुळे छोट्या आणि मध्यम स्तरावरील गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. रूपयाच्या मुल्याची मोठी घसरण विचारात घेता व्यापारातील तुट गगनाला भिडली आहे.
मागील ५ वर्षांत आयात ६२.२१ टक्क्यांनी वाढली. मोदी सरकारचे व्यापार धोरण देशासाठी हानीकारक ठरले आहे, असे टीकास्त्र खर्गे यांनी सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून सोडले. केंद्रात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार असताना १० वर्षांत निर्यात वाढ तब्बल ५४९ टक्के नोंदली गेली. त्याउलट, मोदी सरकारच्या १० वर्षांच्या राजवटीत केवळ २४.७२ टक्के निर्यात वाढ झाली, अशी तुलनाही खर्गे यांनी केली.