Congress President Election – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि ज्येष्ठ नेते शशी थरूर यांच्यात कॉंग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठी लढत होईल, असे चित्र काही दिवसांपर्यंत होते. पण, गेहलोत समर्थक आमदारांनी राजस्थानात राजकीय संकट उभे केल्यानंतर त्या निवडणुकीला वेगळे वळण मिळण्याची चिन्हे आहेत. आता मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचे नाव पुढे आले आहे. त्यामुळे दिग्विजय विरूद्ध थरूर अशी लढत रंगण्याची शक्यता बळावली आहे.
कॉंग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून गेहलोत हे पक्षश्रेष्ठींचे पहिल्या पसंतीचे नाव ठरले होते. मात्र, राजस्थान संकटामुळे गेहलोत यांना रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता धूसर बनली आहे. स्वत: कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ज्येष्ठ नेत्यांशी सल्लामसलत सुरू केली आहे. बुधवारी त्यांनी ज्येष्ठ नेते ए.के.अँटनी यांच्याशी चर्चा केली. त्या चर्चांमधून संभाव्य उमेदवाराच्या नावाची चाचपणी केली जात असल्याचे समजते.
अशात दिग्विजय अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतात, अशी माहिती कॉंग्रेसमधील सुत्रांकडून देण्यात आली. पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा सध्या केरळमधून मार्गक्रमण करत आहे. त्या यात्रेत दिग्विजय सहभागी झाले आहेत. ते बुधवारी रात्री दिल्लीत दाखल होतील, अशी माहितीही पुढे आली. कॉंग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे.
त्यासाठी दोनच दिवस बाकी असल्याने कॉंग्रेसला उमेदवार निश्चितीसाठी लगबग करावी लागणार आहे. थरूर यांनी स्वतंत्रपणे ती निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ते अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. प्रत्यक्ष निवडणूक झाल्यास 17 ऑक्टोबरला मतदान होईल. त्यानंतर 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर करण्यात येईल.