नवी दिल्ली : रुपयाच्या घसरणीवरून देशात वाद सुरूच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील इतर चलनांच्या तुलनेत रुपयाची झपाट्याने घसरण होत असल्याबद्दल विरोधक केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल करत आहेत. गुरुवारी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
सुरजेवाला म्हणाले, “रुपयाची घसरण ही मोदी सरकारची ढासळती विश्वासार्हता आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाने पीएम मोदींचे वय आधीच ओलांडले आहे. पण ज्या वेगाने घसरण होत आहे, ती लवकरच मार्गदर्शक मंडळासाठी निश्चित केलेली वयोमर्यादा ओलांडेल, असा टोला सुरजेवाला यांनी लगावला.
काँग्रेस नेते म्हणाले, “देशातील वाढत्या आर्थिक विषमतेमुळे 142 मोठ्या श्रीमंतांच्या संपत्तीत एका वर्षात 30 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. परंतु देशातील 84 टक्के कुटुंबांचे उत्पन्न घटले आहे.
दरम्यान घसरत चाललेल्या अर्थव्यवस्थेमुळे आपल्या रुपयाचे मूल्य अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 77.56 पर्यंत घसरले आहे. 75 वर्षातील ही सर्वात मोठी घसरण आहे. दुसरीकडे देशाचे कर्ज जे 2014 मध्ये 55 लाख कोटी होते ते वाढले आहे. ते 2022 मध्ये 135 लाख कोटी झाल्याचं सुरजेवाला यांनी सांगितलं.