Delhi Election 2025 – विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जात असलेल्या दिल्लीसाठी कॉंग्रेसने रविवारी तिसरी हमी जाहीर केली. त्यानुसार, दिल्लीची सत्ता मिळाल्यास सुशिक्षित बेरोजगार युवकांना आर्थिक मदत दिली जाईल. ती मदत वर्षभराच्या कालावधीसाठी दरमहा ८ हजार ५०० रूपये इतकी असेल.
कॉंग्रेसचे सरचिटणीस सचिन पायलट यांनी पत्रकार परिषदेत पक्षाच्या तिसऱ्या हमीची म्हणजे युवा उडान योजनेची घोषणा केली. अर्थात, संबंधित योजना मोफत प्रकारातील नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कंपनी, कारखाना किंवा संस्थेत स्वत:चे कौशल्य दाखवणाऱ्या युवकांना आर्थिक मदत मिळेल.
संबंधित कंपनी, कारखाना किंवा संस्थेकडून ती रक्कम उपलब्ध होईल. घरी बसून युवकांना पैसे मिळणार नाहीत. युवकांनी त्यांच्या पायांवर उभे रहावे अशी युवा उडान योजनेमागील कल्पना आहे. अगदीच कुणाला काम उपलब्ध झाले नाही; तर आम्ही बेरोजगार भत्त्याचा भार पेलू, असे पायलट यांनी नमूद केले.
कॉंग्रेसने याआधी प्यारी दीदी योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा २ हजार ५०० रूपये उपलब्ध करण्याची ग्वाही दिली. त्याशिवाय, त्या पक्षाने जीवन रक्षा योजनाही जाहीर केली. त्याअंतर्गत २५ लाख रूपयांचे मोफत आरोग्य विमा कवच उपलब्ध होईल.