शिवसेनेला कॉंग्रेसने पाठिंबा देण्यास “जमात’चा विरोध

नवी दिल्ली: जमात उलेमा-ए-हिंद या संघटनेने शिवसेनेविषयी सावध भूमिका घेण्याचा सल्ला कॉंग्रेसला दिला आहे. कट्टर हिंदुत्ववादी पक्ष शिवसेनेला कॉंग्रेस पाठिंबा देणार का हा यक्ष प्रश्‍न असतानाच “जमात’ने कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय हा कॉंग्रेससाठी हानिकारक ठरेल, असा इशाराही या मुस्लिम संघटनेने दिला आहे.

कॉंग्रेसचे स्थानिक नेते शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी अनुकूल आहेत. पण कॉंग्रेस हायकमांड सध्या द्विधा मन:स्थितीत आहे. अशी परिस्थिती असताना आज मात उलेमा-ए-हिंदने सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रामुळे कॉंग्रेसपुढे अधिकच अडचणी निर्माण झाल्या आहेत.

सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात जमात उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अर्शद मदनी म्हणतात, मी महाराष्ट्रातील अनिष्ट राजकारणाकडे तुमचे लक्ष वेधू इच्छितो. तुम्ही शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत विचार करीत आहात, हे दुर्दैवी आहे. कॉंग्रेस पक्षासाठी हा निर्णय अत्यंत धोकादायक आणि घातक सिद्ध होईल. कॉंग्रेसची ध्येयधोरणे आणि कार्यक्रम यावर या निर्णयाचा परिणाम होणार असून शिवसेनेला पाठिंबा दिल्यास विविध गुंतागुंतीचे प्रश्‍न उपस्थित होऊ शकतात, असा इशाराही मदनी यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.