बीएसएफचे कार्यक्षेत्र वाढवण्याला काँग्रेसचा विरोध; आदेश मागे घेण्यास भाग पाडण्याचा निर्धार

नवी दिल्ली  -सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) कार्यक्षेत्र वाढवण्याला कॉंग्रेसने तीव्र विरोध दर्शवला आहे. तसेच, संबंधित आदेश मागे घेण्यास मोदी सरकारला भाग पाडण्याचा निर्धारही बोलून दाखवला आहे.

मोदी सरकारने नुकताच बीएसएफ कायद्यातील दुरूस्तीचा आदेश जारी केला. त्यामुळे पंजाब, पश्‍चिम बंगाल आणि आसाममधील बीएसएफच्या कार्यक्षेत्रात वाढ झाली आहे. आता ते दल त्या राज्यांमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेपासून 50 किलोमीटर अंतरापर्यंत शोध, जप्ती आणि अटकेची कारवाई करू शकेल. ते अंतर आधी 15 किलोमीटर इतके होते.

बीएसएफशी संबंधित त्या आदेशाला विरोध दर्शवणारा ठराव कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत शनिवारी मंजूर करण्यात आला. बीएसएफ कार्यक्षेत्राच्या वाढीने राज्यांच्या आणि पोलिसांच्या अधिकारांवर अतिक्रमण होणार आहे. त्यामुळे सरकारने आदेश मागे घ्यावा यासाठी कॉंग्रेस प्रयत्न करेल.

त्यासाठीची कृती निश्‍चित करण्यासाठी इतर राजकीय पक्षांशी आणि राज्य सरकारांशी चर्चा केली जाईल, असे त्या ठरावात नमूद करण्यात आले. पंजाब आणि बंगाल सरकारांनी याआधीच बीएसएफचे कार्यक्षेत्र वाढवण्याच्या पाऊलावर आक्षेप घेतला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.